नवनिर्वाचित आमदार रोहित पवार - अतुल बेनकेंचा अभ्यास सुरु - Newly elected MLA Rohit Pawar And Atul Benke start study | Politics Marathi News - Sarkarnama

नवनिर्वाचित आमदार रोहित पवार - अतुल बेनकेंचा अभ्यास सुरु

मिलिंद तांबे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019शरद पवारांच्या सूचनेनुसार विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती लायब्ररीतून घेत आहोत. अर्थसंकल्पाच्या नियोजनाची माहिती मी घेत असून ज्येष्ठ सदस्यांनी लिहिलेली पुस्तकं सोबत घेतली आहेत.मुंबईत आल्यानंतर दोन तास तरी लायब्ररीत वाचन करण्याचं ठरवलं आहे.

-अतुल बेनके, आमदार ,जुन्नर

मुंबई : नवनिर्वाचित आमदारांनी विधीमंडळ आणि प्रशासकीय कामकाजाचा अभ्यास करावा असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधान भवनातील लायब्ररी गाठून विधिमंडळातील कामकाजाचा अभ्यास सुरू केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार अतुल बेनके आणि रोहित पवार यात आघाडीवर आहेत.

विधानसभेवर निवडून आलेल्या नवीन आमदारांची संख्या यावेळी मोठी आहे.एकट्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात पंधरा नवनिर्वाचित आमदार आहेत.यांच्या माध्यमातूनच विधीमंडळाच कामकाज होणार आहे.नवनिर्वाचित आमदारांना विधिमंडळातील कामकाजाची माहिती मिळावी यासाठी नवीन आमदारांनी विधिमंडळाच्या लायब्ररीत जाऊन आवश्‍यक अभ्यास करावा अश्‍या सूचना शरद पवार यांनी दिल्या होत्या.त्यानंतर राष्ट्रवादीच्या बऱ्याच नवीन आमदारांनी लायब्ररीत जाऊन अभ्यास सुरू केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जुन्नर मधील आमदार अतुल बेनके यांनी विधिमंडळ कामकाजाच्या पहिल्याच दिवशी लायब्ररी गाठली.लायब्ररीचे प्रमुख बाबा वाघमारे यांची भेट घेऊन विविध विषय आणि पुस्तकांची माहिती घेतली.यावेळी बेनके यांच्यासोबत रोहित पवार देखील होते. यावेळी त्यांनी लायब्ररीत दोन तास घालावले. यादरम्यान त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्प,आर्थिक नियोजनाची माहिती घेतली.यासह यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भारदे यांच्या कार्यासह विधानसभेच्या कामकाजाची माहिती घेतली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने अनेक नवीन आमदारांना सरकारमध्ये कामकाज करण्याची संधी मिळाली आहे.सभागृहात अभ्यासपूर्ण प्रश्न कसे उपस्थित करावे,चर्चचे सहभाग कसा घ्यावा, शून्यप्रहर, लक्षवेधी याची माहिती घेण्याचा प्रयत्न आमदार करत आहेत. त्याचप्रमाणे विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास ही या आमदारांनी सुरू केला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख