आंबेडकरांना शह देण्यासाठी नवीन वंचित आघाडी : धोबी, नाभिक, कैकाडी व मातंग समाजाचे ऐक्‍य

आंबेडकरांना शह देण्यासाठी नवीन वंचित आघाडी : धोबी, नाभिक, कैकाडी व मातंग समाजाचे ऐक्‍य

मुंबई : राज्याच्या राजकारणात सामाजिक समीकरणाने वंचित बहुजन आघाडीने आव्हान उभे केले असताना आता चार समाजाची स्वतंत्रपणे नवी वंचित आघाडी स्थापन होण्याचे संकेत आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीत या चार समाजाने एकत्रपणे सामोरे जाण्याचा निर्णय  राज्यव्यापी धोबी समाज आरक्षण कृती समितीमधे घेण्यात आला आहे.

धोबी, नाभिक, कैकाडी व मातंग या समाजाची ही वंचित आघाडी असेल अशा ठराव आजच्या या बैठकीत करण्यात आला आहे. मुंबईत धोबी समाजाची काल राज्यव्यापी बैठक झाली. त्यामधे हा निर्णय घेण्यात आला.

धोबी, नाभिक, कैकाडी या समाजाचा अनुसूचित जमातीत (एससी) समावेश व्हावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. तर मातंग समाजाला एससी प्रवर्गातून स्वतंत्र आरक्षण हवे आहे. यासाठी मातंग समाजाने सरकारकडे अनेकवेळा मागणी केली असून आंदोलने देखील उभारली आहेत.

धोबी समाज देशभरातील अठरा राज्यांत एससींमध्ये समाविष्ठ आहे. मात्र, महाराष्ट्रात भाषिक प्रांतरचनेनंतर 1960 मधे या समाजाला या प्रवर्गातून वगळल्याचे सांगितले जाते. 2002 मधे तत्कालीन राज्यपालांनी डॉ. दशरथ भांडे यांची समिती नेमून धोबी समाजाला अनुसूचित जातींत समावेश होवू शकतो काय याबाबत अभ्यास करण्यास सांगितले होते. डॉ. भांडे समितीने 2004 मधे धोबी समाजाला एससीत समाविष्ट करण्याची शिफारस अहवालात केली होती.

नाभिक समाजाला देखील देशातील अनेक राज्यात मागासप्रवर्गाचा दर्जा आहे. कैकाडी समाजातील काही उपजाती एससीत आहेत. त्यामुळे संपूर्ण कैकाडी समाजाला एससीत समाविष्ट करण्याची मागणी आहे. 
मातंग समाज एससीत असला तरी त्यांना या प्रवर्गातून स्वतंत्रपणे आठ टक्‍के आरक्षण मिळावे, अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे. मागील तीन वर्षापुर्वी मातंग समाजाने स्वतंत्र आरक्षणासाठी पुणे येथे राज्यव्यापी बैठक घेवून सरकारकडे मागणी देखील केल्याचे सांगण्यात आले. मात्र, राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाबाबत भूमिका घेतली नसल्याचा रोष या समाजामधे आहे. 

डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाल्यानंतरही या चार समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा दावा करत नवीन वंचित आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहीती धोबी समाज आरक्षण कृती समितीचे समन्वयक प्रा. सदाशिव ठाकरे यांनी दिली. आजच्या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व मराठा आरक्षणाचे अभ्यासक प्रा. बाळासाहेब सराटे यांनी मार्गदर्शन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com