मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेने नव्या जुन्यांची सांगड घालून पक्ष बळकट करण्याची रणनिती स्वीकारली आहे. या रणनितीचा भाग म्हणून शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना लवकरच पक्षविस्ताराची जबाबदारी देण्यात येणार असून मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या तरूण नेत्यांनाही संघटनात्मक पातळीवरील आव्हानात्मक जबाबदा-या देण्यात येणार आहेत.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत, तानाजी सावंत या माजी मंत्र्यांसह विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झालेले माजी मंत्री विजय शिवतारे, अर्जुन खोतकर यांच्यासह लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवाजीरावर आढळराव, अनंत गिते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ या खासदारांसह अनेक ज्येष्ठ तसेच तरूण पदाधिका-यांना पक्षविस्तारासाठी जुंपले जाणार आहे.
ज्या ठिकाणी थोडया फरकाने विधानसभेत पराभव झाला आहे. अशा जागांवर स्थानिक नेत्यांना बळ देण्याचे पक्षाचे धोरण आहे. सध्या राज्यात सत्तेवर पक्ष असून पक्षप्रमुख मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळत आहेत तर युवासेना प्रमुख हे प्रथमच आमदार होउन कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे सत्तेचा पक्षविस्तारासाठी फायदा उठवून घेण्यासाठी लवकरच विभागावर पातळीवर या ज्येष्ठ तसेच कनिष्ठ नेत्यांना जबाबदारी देण्यात येणार आहे. यामध्ये आढळराव, शिवतारे यांना पश्चिम महाराष्ट्र, तानाजी सावंत, खोतकर, खैरे यांना मराठवाडा, मुंबईत रविंद्र वायकर, रावते तर कोकणात दिपक केसरकर यांच्या खांद्यावर पक्ष बळकट करण्याची जबाबदारी टाकण्यात येणार असल्याचे समजते

