New political developments in Akola for standing committe | Sarkarnama

अकोल्याचे राजकारण `स्थायी`वरून तापले

श्रीकांत पाचकवडे : सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 12 एप्रिल 2017

अकोल्यात स्थायी समिती सदस्य निवडण्याचा मुहूर्त सापडला असून शनिवारी स्थायी समितीवर सदस्यांची निवड होणार असल्याने मनपातील राजकारण तापू लागले आहे.

अकोला, ता. १२ : अकोला महापालिका निवडणूक होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर महापालिकेत स्थायी समितीची स्थापना न झाल्याने पूर्वीचेच दिवस परत येणार का, असा प्रश्‍न नगरसेवकांमधून उपस्थित होऊ लागला होता. अखेर स्थायी समिती सदस्य निवडण्याचा मुहूर्त सापडला असून शनिवारी स्थायी समितीवर सदस्यांची निवड होणार असल्याने मनपातील राजकारण तापू लागले आहे.

अकोला महापालिकेच्या इतिहासात एकहाती सत्ता ताब्यात घेत भाजपने नवा इतिहास रचला आहे. निवडणुकीत भाजपची कमांड खासदार संजय धोत्रे, आममदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे होती. या त्रिमुर्तीनी प्रभागाचे सामाजीक समीकरण आणि नियोजनबद्ध आखणी करीत महापालिकेत सर्वांधिक अठ्ठेचाळीस नगरसेवक विजयी करत एकहाती सत्ता ताब्यात घेतली. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवडीवरही खासदार संजय धोत्रे गटाचाच वरचष्मा राहिला आहे. या महत्वपूर्ण पदावर धोत्रे गटाचे विजय अग्रवाल महापौर तर उपमहापौर पदावर वैशाली शेळके यांची वर्णी लागली. त्यानंतर आता महापालिकेची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये निवडीसाठी सध्या धुमशान सुरू झाले आहे. सोळा सदस्यांची वर्णी स्थायी समितीमध्ये लागणार आहे.

महापौर आणि उपमहापौर वगळता उर्वरित ७८ सदस्यांमधून हे सोळा सदस्य निवडले जाणार आहे. त्यामुळे ४९ सदस्य असलेल्या भाजपच्या वाट्याला सर्वाधिक दहा सदस्य येणार आहे. हे दहा सदस्य कोण असणार, याबाबत नगरसेवकांमध्ये उत्सुकता आहे. कसेही करून स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी, यासाठी खासदार, आमदारांसह पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे उंबरठे झिजविले जात आहे. खासदार धोत्रे आणि पालकमंत्री डॉ. पाटील यांच्या गटांतील राजकीय शीतयुद्ध स्थायी समितीच्या निवडीमध्येही सुरू आहे. त्यामुळे कोणत्या गटाच्या नगरसेवकाची स्थायी समितीवर वर्णी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

आघाड्यांच्या राजकारणाने गुंता वाढला
महापालिकेत भाजप वगळता कोणत्याही पक्षाला फारशे यश आले नाही. संख्याबळावर काँग्रेस दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपनंतर या पक्षाच्या वाट्याला तीन सदस्य येण्याची शक्यता होती. परंतु, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतर छोटे पक्ष आणि अपक्षांना सोबत घेवून स्वतंत्र आघाड्या स्थापन केल्यामुळे काँग्रेसची अडवणूक झाली आहे. आता काँग्रेसला तीन सदस्य निवडून आणण्यासाठी दोन मतांचा ‘जुगाड’ लावावा लागणार आहे. दुसरीकडे शिवसेना दाेन आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीही दोन सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख