माजी पोलिस आयुक्तांचा आणखी एक आदेश नव्या आयुक्तांकडून स्थगित - New Mumbai CP Stays one more order of his predecessor | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

माजी पोलिस आयुक्तांचा आणखी एक आदेश नव्या आयुक्तांकडून स्थगित

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 मार्च 2020

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेल्या आणखी एका निर्णयाला नवे आयुक्त परमबीर सिंग यांनी स्थगिती दिली आहे

मुंबई  : संजय बर्वे पोलिस आयुक्त असताना १२ अधिकाऱ्यांनी परस्पर दहशतवादविरोधी पथक (एटीएस)मध्ये जाण्यासाठी पोलिस महासंचालकांकडे अर्ज केला होता. त्यावर शिस्त भंगाची कारवाई म्हणून बर्वे यांनी त्या १२ अधिकाऱ्यांची आगामी वार्षिक वेतनवाढ एक वर्षासाठी का रोखण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस दिली होती. मात्र बर्वेंच्या निवृत्तीनंतर अवघ्या दोन दिवसांनी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दुसऱ्याच दिवशी या कारवाईला स्थगिती दिली आहे. तसेच भविष्यात असे वर्तन होता कामा नये, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

माजी पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली, त्या काळात तत्कालीन सहपोलिस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था)देवेन भारती यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदाची नियुक्ती झाली होती. भारती यांची नियुक्ती झाल्यानंतर पोलिस दलातील १२ अधिकाऱ्यांनी भारती यांच्यासोबत काम करण्यास मिळावे. यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना डावलून थेट महासंचालकांकडे अर्ज केले. 

त्यावर १२ अधिकाऱ्यांनी बदलीसाठी केलेला अर्ज मुंबई पोलिस दलाच्या शिस्तप्रियतेला धरून नसल्याचा ठपका ठेवत आयुक्त संजय बर्वे यांनी १२ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीसांमुळे पोलिस दलातील दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. आयुक्तांच्या कडक पवित्र्यामुळे मुंबई पोलिसांत खळबळ उडाली. या अधिकाऱ्यांचा आगामी काळातील एक वर्षाचे वेतन रोखण्याचे आदेश बर्वे यांनी दिले होते.

बर्वे यांनी काढलेल्या आदेशाला नवनिर्वाचित पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्थगिती दिली आहे. बर्वेंनी १२ अधिकाऱ्यांनी बदलीसाठी केलेला अर्ज मुंबई पोलिस दलाच्या शिस्तप्रियतेला धरून नसल्याचा ठपका ठेवत पाठवलेल्या नोटीसीला वरील अधिकाऱ्यांनी उत्तर दिले होते. अधिकाऱ्यांनी पाठवलेली उत्तरामधील मुद्दे समर्थनिय वाटत असल्याचे सांगत, परमबीर सिंह यांनी १२ अधिकाऱ्यांच्या शिक्षेत बदल करून त्या अधिकाऱ्यांचे वेतन न रोखण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भविष्यात असे वर्तन होता कामा नये, याची दक्षता घेण्याची समजही देण्यात आली आहे.

या कर्तबगार अधिकाऱ्यांचा समावेश 

बर्वेंनी शिक्षा सुनावलेल्या याच अधिकाऱ्यांनी एकेकाळी गुन्हे शाखेत कार्यरत असताना मुंबई गुन्हे शाखेचा गुन्हेगारांवर चांगलाच वचक ठेवला होता. मुंबईत आतापर्यंत महत्वाच्या अनेक गुन्ह्यांचा तपास हा या बारा अधिकाऱ्यांनी करत, आरोपींना तुरूंगात डांबलं आहे. त्यात प्रामुख्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन अलकनुरे, दिनेश कदम, पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, ज्ञानेश्‍वर वाघ, दया नायक, सुधीर दळवी, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीप बने, विशाल गायकवाड, दिपाली कुलकर्णी, लक्ष्मीकांत साळुंखे, विल्सन रॉड्रीग्स, अश्‍विनी कोळी यांची नावे आहेत. यापूर्वी बर्वे यांनी निवृत्ती पूर्वी केलेल्या ३१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर परमबीर सिंग यांनी स्थिगिती आणली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख