New Medical Colleges | Sarkarnama

प्रत्येक जिल्ह्‌यात डॉक्‍टरांचा होणार सुकाळ

संजीव भागवत
बुधवार, 26 एप्रिल 2017

डॉक्‍टरांची संख्या वाढविणे आणि त्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर नवीन आरोग्य विज्ञान महाविद्यालयांची स्थापना करणे हा एकच पर्याय असल्याने त्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याने येत्या काळात डॉक्‍टरांची संख्या मोठ्‌या प्रमाणावर वाढणार आहेत

मुंबई - राज्यातील वैद्यकीय अथवा आरोग्य विज्ञान महाविद्यालयांमध्ये मोठ्‌या प्रमाणात डॉक्‍टरांची महाविद्यालयांचीही संख्याही मोठ्‌या प्रमाणात कमी असून यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागते. डॉक्‍टरांची संख्या वाढविणे आणि त्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर नवीन आरोग्य विज्ञान महाविद्यालयांची स्थापना करणे हा एकच पर्याय असल्याने त्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याने येत्या काळात डॉक्‍टरांची संख्या मोठ्‌या प्रमाणावर वाढणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्री गिरीष महाजन यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईत दिली.

राज्यातही जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनाप्रमाणे प्रत्येक हजार लोकसंख्येच्या मागे किमान 4 डॉक्‍टर असणे आवश्‍यक आहे, मात्र आपल्याकडे ही परिस्थिती खूपच बिकट असून प्रत्येक हजार लोकसंख्येमागे केवळ 0.64 इतके डॉक्‍टर्स आहेत. तर महाविद्यालयांची संख्याही अपुरी असून ही सर्व परिस्थिती लक्षात घेउन जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहितीही मंत्री महाजन यांनी दिली.

जळगाव येथील या नवीन वैद्यकीय संकुलात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय महाविद्यालय, 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय आणि 40 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय केंद्र सुरू करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.  

या एकात्मिक वैद्यकीय संकुलासाठी 1250.60 कोटी इतका खर्च अपेक्षित असून या खर्चालाही मान्यता देण्यात आल्याने जळगाव येथे हे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल लवकरच उभे राहील व त्याच प्रमाणे येत्या काळात प्रत्येक जिल्ह्‌यांमध्ये यासंकुलाच्या धर्तीवर नवीन आरोग्य विज्ञान महाविद्यालयांना मान्यता देण्याची कार्यवाही केली जाईल असेही महाजन म्हणाले.

तसेच नाशिक येथे 1 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य महाशिबीरात 1 लाख 60 हजार व्यक्‍तींनी लाभ घेतला, त्याच पार्श्‍वभूमीवर येत्या 30 एप्रिल रोजी नंदुरबार येथे अशाच प्रकारचे आरोग्य महाशिबीर आयोजित करण्यात आले असून या जिल्ह्‌यात असलेल्या कुपोषणग्रस्त महिला आणि बालकांना त्याचा लाभ होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख