नव्या समीकरणांचा कोल्हापुरातही धुरळा : महाडिकांचा संघर्ष अटळ

नव्या समीकरणांचा कोल्हापुरातही धुरळा : महाडिकांचा संघर्ष अटळ

कोल्हापूर ः राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र येण्याची शक्यता अद्याप असल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. कॉंग्रेसकडून जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे प्रयत्न होतील, त्यात शिवसेनेलाच पुन्हा उपाध्यक्षपद मिळण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर आगामी महापालिकेसह गोकुळ, जिल्हा बॅंक व बाजार समितीतही या नव्या राजकीय समीकरणांचे पडसाद उमटणार आहेत.

राज्यात अस्तित्वात आलेल्या या नव्या समीकरणाची पहिली सुरवात जिल्ह्यात जिल्हा परिषदेतून होईल. जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले 10 तर शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर गटाचे 1 असे 12 सदस्य आहेत. यापैकी 7 सदस्य यापूर्वीच भाजपसोबत तर सेना खासदार प्रा. संजय मंडलिक यांचे 2 व माजी आमदार उल्हास पाटील यांचा 1 असे तीन सदस्य कॉंग्रेससोबत आहेत.

आमदार आबिटकर यांच्याही 2 सदस्यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या अध्यक्ष निवडीत सेनेचे सर्वच सदस्य कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीसोबत जाण्याची शक्‍यता आहे. त्याचा अंतिम निर्णय मात्र त्या त्यावेळच्या परिस्थितीत घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

पुढील वर्षी महापालिकेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढतील, त्यातही भाजपच्या जागा कमी करण्याची रणनीती या नव्या आघाडीच्या निमित्ताने राबविली जाण्याची शक्‍यता आहे. सत्ता स्थापन करताना मात्र पुन्हा नव्या आघाडीचा फॉर्म्युला वापरला जाईल. जिल्हा बॅंकेत सेनेला प्रा. मंडलिक वगळता आतापर्यंत संधीच नव्हती, तर अनिल पाटील हे एकमेव भाजपचे संचालक आहेत.

बॅंकेचीही निवडणूक पुढील वर्षी होत आहे, त्यात आघाडी धर्म म्हणून सेना आणखी एखाद्या जागेवर हक्क सांगण्याची शक्‍यता आहे.
मंडलिक हे मूळचे राष्ट्रवादीचे पण पर्याय नसल्याने त्यांनी शिवसेनेची वाट धरली. जिल्हा बॅंकेचे सभासद असलेल्या सर्वाधिक विकास सोसायट्यांवर कॉंग्रेस, राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे, त्यामुळे तालुक्‍यातून निवडून द्यायच्या संचालकांत दोन्ही कॉंग्रेसचेच वर्चस्व राहिल. राखीव गटातील एखाद दुसरी जागा सेनेला दिली जाण्याची शक्‍यता आहे.

"गोकुळ'मध्ये महाडिकांना
रोखण्याचा होणार प्रयत्न
जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या "गोकुळ' मधील राजकीय समीकरण मात्र या नव्या आघाडीने बदलणार आहे. सध्या कॉंग्रेसचे आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक "गोकुळ' चे नेतृत्व करत असले तरी महाडिक यांचे पुत्र अमल व पुतणे धनंजय भाजपसोबत आहेत. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी पी. एन. यांना पुढे करून त्यांच्याकडेच सूत्रे देऊन श्री. महाडिक यांना रोखण्याचा प्रयत्न सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचा असेल. त्यात पी. एन. यांची किती साथ मिळणार, हे महत्त्वाचे आहे. त्यातही काही संचालकांनी अलीकडेच निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशा संचालकांचीही पंचाईत होणार आहे.


बाजार समितीत कोरेंना
शह देण्याची शक्‍यता
बाजार समितीत सतेज पाटील, राष्ट्रवादी, जनसुराज्य, शेकाप, समरजितसिंह घाटगे यांची एकत्रित सत्ता आहे. सेनेच्या दोन संचालकांपैकी शशिकांत आडनाईक यांनी यापूर्वीच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. "जनसुराज्य'चे विनय कोरे हे भाजपसोबत असल्याने त्यांना बाजार समितीत शह देण्यासाठी सेनेला सत्तेत वाटा दिला जाण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com