ठाकरे-पवार भले एकत्र येतील; पण वळसे-आढळरावांच्या समर्थकांनी काय करायचे?

आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा वाद टोकाचा आहे. त्याचा विकासकामांवरही अनेकदा परिणाम झाला आहे.
ठाकरे-पवार भले एकत्र येतील; पण वळसे-आढळरावांच्या समर्थकांनी काय करायचे?

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे एकवेळ राज्यात एकत्र येतील. आंबेगाव तालुक्यातील माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलही सोबत दिसू शकतील. पण गेली तब्बल 15 वर्षे एकमेकांचे गळे धरणाऱ्या वळसे आणि आढळराव यांच्या समर्थकांनी काय करायचे, असा मोठा प्रश्न आंबेगाव- शिरूर या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसमोर आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस या तीनही पक्षांचे एकत्र सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या सरकारच्या मंत्रिमंडळात कोण असणार, याचेही अंदाज बांधण्यात येऊ लागले आहेत. त्यात राष्ट्रवादीकडून पुणे जिल्ह्यातून वळसे पाटील यांचे तर शिवसेनेकडून आढळराव यांचेही नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील सामना या मतदारसंघात जोरात असतो. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या तालुक्यात शिवसेनाही तोडीस तोड आहे. त्यामुळे अधुनमधुन राजकीय वादाचे रुपांतर भांडणात होत असते. 

नव्या सत्तारचनेत नेत्यांची सोय लागत असताना त्यांच्या समर्थकांपुढे मात्र प्रश्न निर्माण होऊ शकतात. कारण या मतदारसंघातील प्रत्येक गावात दोन्ही नेत्यांचे गट आहेत. दोन्ही गट प्रत्येक निवडणुकीत अटितटीने लढतात. दोन्ही गटांना हे नेते आपापल्या पद्धतीने ताकद देतात. अनेकांच्या पोलिस स्टेशनच्या वाऱ्या या गटातटाच्या भांडणातून सुरू आहेत. कोणी वळसे पाटलांचा कट्टर तर कोणी आढळराव दादाप्रेमी, अशी या मतदारसंघात विभागणी आहे. दोन्ही नेते जुने मित्र असले तरी त्यांच्यातील स्पर्धकाची भावना लपून राहिलेली नाही.

लोकसभा निवडणुकीत आढळरावांना पराभूत करण्याचे वळसे पाटलांचे स्वप्न साकार झाले. पण प्रत्यक्षात अशी परिस्थिती येऊ घातली आहे की आता या दोघांनाही एकमेकांशी जुळवून घ्यावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच आगामी काळात या तालुक्यातील त्यांचे कार्यकर्ते या युतीला कसा प्रतिसाद देतात, हे पाहायला हवे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com