New Delhi Political Pawar gave suggestions on loan waiver - Chandrakant dada patil | Sarkarnama

  कर्जमाफीच्या मुद्द्यावर  पवार यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या :  चंद्रकांत पाटील 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 जून 2017

अर्धातास चाललेल्या या बैठकीदरम्यान कर्जमाफीसोबतच इतरही मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे बैठक संपल्यानंतर पवार आणि फडणवीस या दोघांमध्ये काही काळ स्वतंत्र बोलणी झाल्याचेही कळाले.

नवी दिल्ली: राज्यातील शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सविस्तर चर्चा झाली असून त्यात पवार यांनी महत्त्वाच्या सूचना केल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

तर, कर्जमाफीमध्ये राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा समावेश व्हावा, अशा आग्रह राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आहे. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आता राजकीय पक्षांशी चर्चा करण्याच्या निर्णयांतर्गत फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्लीत शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

याप्रसंगी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील आदी प्रमुख नेतेही उपस्थित होते. परंतु, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यात समावेश नव्हता. 

मुख्यमत्री  आणि महसूलमंत्र्यांनी राज्याच्या खजिन्याची परिस्थिती आणि कर्जमाफीमुळे पडणारा भार याची बाजू मांडताना एक लाखापर्यंत कर्जमाफीची मर्यादा ठेवण्याबाबत सरकारची भूमिका मांडली.

अर्धातास चाललेल्या या बैठकीदरम्यान कर्जमाफीसोबतच इतरही मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे बैठक संपल्यानंतर पवार आणि फडणवीस या दोघांमध्ये काही काळ स्वतंत्र बोलणी झाल्याचेही कळाले.

बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना चर्चेची माहिती दिली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशीही यामुद्‌द्‌यावर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

कर्जमाफीच्या प्रस्तावानुसार, राज्यात 30 जून 2016 पर्यंत कर्ज थकबाकी असणाऱ्या 83 टक्के शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार असून त्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होईल.

यासाठी 25 हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारला करावी लागणार आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्यांसाठीही वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. ही एकत्रित रक्कम 37 हजार कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे.

याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी काही सूचना केल्या आणि राज्याची आर्थिक स्थिती आणि कर्जमाफी यात समन्वय साधण्यासाठी मदतीचे आश्वासनही दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्राची कर्जमाफी सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशसह, पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेश, सारख्या राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आणि ऐतिहासिक असेल, असाही दावा त्यांनी केला. 

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सरकारला तिजोरीची चिंता करू नका असा सल्ला दिला.

तर सुनील तटकरे यांनी राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा, अशी मागणी केली. तर हा कर्जमाफीचा प्रस्ताव म्हणजे राज्यसरकारला उशीरा सुचलेले शहाणपण असून लवकरच तोडगा निघावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख