पिंपरीत भाजप, शिवसेनेत दुरावा, तर शिवसेना, राष्ट्रवादीत मैत्री

पिंपरीत भाजप, शिवसेनेत दुरावा, तर शिवसेना, राष्ट्रवादीत मैत्री

पिंपरी : भाजपमुळे शिवसेनेला अच्छे दिन आल्याची खोचक टिपण्णी शिवसेना खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमध्ये केली. त्यांनी ठरविल्यानेच राज्यात सरकार बदल होऊन शिवसेनेचे सरकार आल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. त्यांनी दिलेला शब्द पाळला असता, तर..असे सांगत अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपलाच राज्यात युतीचे सरकार स्थापन न होण्यास जबाबदार धरले आहे. 

दरम्यान, लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुकीला आतापर्यंत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शहरातील शिवसेना व भाजपच्या खासदार,आमदार,नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांत दुरावा आल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादीतील जवळीक वाढली आहे. बारणे यांच्या आजच्या पत्रकारपरिषदेला राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या उपस्थितीतून त्याला दुजोरा मिळाला. दुसरीकडे पालिकेतील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयात राष्ट्रवादी नगरसेवकांचा वावरही आता वाढला आहे. 

पाणीपुरवठा करणारे पवना धरण भरलेले असूनही शहरात पाणीटंचाई सुरु आहे. पावसाळ्यातही ती सुरुच होती. त्याचा काही अंशी फटका युतीला नुकताच विधानसभेला बसला. त्यांची (शिवसेना) शहरातील तीनपैकी पिंपरीची एक जागा गेली. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दोन कारभारी आमदारांनी आपल्या नगरसेवकांची कालच झाडाझडती घेतली. तेच आता शहरातील पाण्यासह इतर सर्व नागरी प्रश्नात जातीने लक्ष घालणार आहेत. 

त्यानंतर लगेचच आज खा.बारणे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची पाणीप्रश्नीच भेट घेतली. त्यानंतर पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी राज्यात शिवसेनेचे सरकार येत असल्यावर भाजपवर वरील उपरोधीक टिपण्णी केली. हा प्रश्न सुटला नाही,तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. पालिका प्रशासन पाणीपुरवठ्यासंदर्भात निष्क्रीय ठरल्याचे एकीकडे सांगताना आयुक्तांच्या बदलीने हा प्रश्न सुटणार नसल्याचेही ते म्हणाले. आयुक्ताचा वचकच राहिला नसल्याने पाण्याच्या तक्रारीची दखलच घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही निष्क्रीय ठरलोय,असे प्रशासनाने घोषित करावे म्हणजे त्यांच्याकडे कुणी तक्रारच घेऊन येणार नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, नेहमीसारखे पाणीटंचाई व विस्कळीत पाणीपुरवठ्याचे खापर आयुक्तांनी चाळीस टक्के पाणीगळतीवरच फोडले.याप्रश्नी विशेष पालिका सभा बोलावण्याचे आश्वासन त्यांनी खा.बारणेंना दिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com