Never thought that Thakare will force Fadnvis to sit in opposition leaders chair | Sarkarnama

ठाकरे फडणवीसांना विरोधी पक्ष नेतेपदाच्या खुर्चीत बसवतील असे वाटले नव्हते :मुंडे 

सरकारनामा 
सोमवार, 2 डिसेंबर 2019

उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवर बसवतील असे कधी वाटले नव्हते

मुंबईः "राज्यात महायुतीचे सरकार येणार आणि आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागणार असे आम्ही समजून होतो. पण गेल्या महिनाभरात राजकारणात ज्या घडामोडी झाल्या त्यानंतर जे सत्तेत बसतील असे वाटत होते ते विरोधी पक्षात बसले आणि, जी कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधी पक्षात बसेल असे वाटले होते, ती शिवसेनेच्या सोबत सत्तेत आली. उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवर बसवतील असे कधी वाटले नव्हते' अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस यांची रविवारी  विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली. त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलतांना धनंजय मुंडे यांनी भाजपला चांगलेच चिमटे काढले. मुंडे म्हणाले, नियतीचा खेळ वाईट असतो, मी पुन्हा येईन असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा आले, पण विरोधी पक्षनेते म्हणून हे आता स्पष्ट झाले आहे. देवेन भाऊ यांचा मी भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्षपदापासून ते आता विरोधी पक्षनेते पदापर्यंतचा प्रवास पाहिला आहे.

आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो, आता विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यानंतरही आता सत्ताधारी पक्षाला कशी उत्तरे द्यायची यासाठी ते उत्सूक झाले आहेत. सत्तेत असतांना तुम्ही मागच्या सरकारचे हे पाप आहे असे म्हणून जबादारी झटकत होतात, आता तुम्हालाही ते ऐकून घेण्याची तयारी ठेवावी लागेल असा चिमटाही धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना काढला.

तुम्ही कायम विरोधीपक्ष नेता राहा..

विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता झालो तेव्हा देवेन भाऊंनी मला, शुभेच्छा देतांना काढलेले उद्‌गार मला आजही आठवतात. जनतेचे प्रश्‍न विरोधी पक्षनेता म्हणून सभागृहात मांडण्याची तुम्हाला संधी मिळाली, ती कायम राहो असे ते म्हणाले होते. आता मी ही तुम्हाला तशाच शुभेच्छा द्याव्यात का? हा खरा प्रश्‍न आहे. त्यामुळे मी पुन्हा तेच सांगतो की, नियतीचा खेळ वाईट असतो.

सभागृहात आता अनेक प्रसंग येणार आहेत, विरोधी पक्षनेता म्हणून जनतेच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे. सत्ताधारी पक्षाकडून जनतेच्या हिताची कामे होतील तेव्हा मोठ्या मनाने साथ द्या, केवळ विरोधाला विरोध म्हणून विरोध करू नका, असे आवाहन करतांनाच देवेन भाऊंना विरोधी पक्षनेते पदाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आपले भाषण संपवले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख