पाकिस्तानातून आलेल्या दलित, पीडितांसाठी आंदोलन करा: मोदी

शरणार्थींना मदत करणे आमच्या देशातील नागरिकांचे कर्तव्य आहे. पाकिस्तानातून आलेले हिंदू दलित बंधू-भगिनींचे रक्षण करणे ही आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे.
narendra modi
narendra modi

बंगळूर: दहशतवादाविरोधात भारत लढत आहे. त्यासाठीच काश्‍मिरमधून 370 कलम हटवून तेथील अनिश्‍चितता व दहशत कमी करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी संसदेच्या विरोधात टीका करण्याचे सोडून पाकिस्तानातून आलेले दलित, पीडित व शोषितांसाठी आंदोलन करावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

तुमकूरमधील सिद्धगंगा मठात गुरुवारी डॉ. शिवकुमार स्वामी वास्तूसंग्रहालयाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा समाचार घेतला.

ते म्हणाले, "तुम्हाला घोषणाबाजीच करायची असेल तर पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात घोषणा द्या. मिरवणुका काढायच्या असतील तर, पाकिस्तानातून आलेल्या दलित व शोषितांसाठी आंदोलन करा. पाकिस्तानच्या कुरापतींविरोधात आंदोलने करायची सोडून नागरिकत्व कायद्याविरोधात विरोधी पक्षांनी आंदोलन सुरु केले आहे. काही आठवड्यापूर्वी संसदेत नागरिकत्व कायदा संमत झाला. पण, कॉंग्रेस व कॉंग्रेसप्रणित संस्था संसदेच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. देशाच्या संसदेच्या विरोधातच आंदोलन सुरु आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

पाकिस्तानाचा जन्म धर्माच्या आधारावर झाला आहे. तेव्हापासूनच इतर धर्मियांवर अत्याचार केले जात आहेत. हिंदू, शीख, जैन, ख्रिश्‍चनधर्मियांना त्याचा फटका बसला. त्यामुळेच ते लोक भारतात आश्रयासाठी आले. पण, पाकिस्तानविरोधात कॉंग्रेस काहीच बोलत नाही. पाकिस्तानातील अल्पसंख्यांक लोकांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत कॉंग्रेस गप्प का, असा सवाल करतानाच त्यांनी आंदोलन करायचेच असल्यास पाकिस्तानात गेल्या 70 वर्षांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात आंदोलन करण्याचा सल्ला दिला.

शरणार्थींना मदत करणे आमच्या देशातील नागरिकांचे कर्तव्य आहे. पाकिस्तानातून आलेले हिंदू दलित बंधू-भगिनींचे रक्षण करणे ही आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची दुष्कृत्ये समोर आणणे गरजेचे आहे. त्यानुसार शेजारील देशातील शरणार्थींचा सन्मान करण्याचे कार्य भारत करीत आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com