negative thoughts off as we touch cow : yashomati thakur | Sarkarnama

गायीच्या पाठीवरून हात फिरविल्याने नकारात्मक विचार जातात : यशोमती ठाकूर

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 12 जानेवारी 2020

ठाकरे मंत्रिमंडळात आपल्या वक्तव्याने चर्चेत राहणाऱ्यांत मंत्री यशोमती ठाकूर यांनी बाजी मारली आहे.

तळेगाव ठाकूर ः गाय म्हणजे माता आणि माता म्हणजे राजकारण नव्हे. नाहीतर मागच्या काळामध्ये चहावाली सरकार गायवर अटकली, असं काहीतरी झालं होतं. पण आता त्याच्याही पलीकडे जाऊन सर्वांनी मिळून काम करायचं आहे, असे मत अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मांडले.

तिवसा तालुक्‍यातील सार्शी (गायीची) येथे गावाचे दैवतं समजल्या जाणाऱ्या एका दिवंगत गायीच्या पुण्यतिथीनिमित्ताने सात दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते. शनिवारी (ता.11) या महोत्सवाचा समारोप झाला. या वेळी त्या बोलत होत्या.

जिल्हाभरातून राजकीय मंडळी व भाविक भक्तांनी उपस्थिती लावली होती. या वेळी खासदार नवनीत राणा उपस्थिती होत्या.

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी समारोपीय कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, की आपण जे काम करतो त्याला धर्म मानतो, आपण जे विचार करतो त्याला धर्म म्हणतो, सातत्याने विठ्ठलाचे नामःस्मरण केले तर आपल्या आकांक्षा इच्छा पूर्ण होतात. मात्र विठ्ठलाच्या पाया पडणे म्हणजे झालं असं नाही. आज तरुण युवकांना वेगवेगळ्या पदावर जायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे.

व्यक्तिमत्त्व विकासाचे खूपसारे कोर्स येत असून मोठेमोठे लोक प्रशिक्षण घेतात. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसाही घेतला जातो, यामुळे आपण आपली संस्कृती विसरतो. आपल्यामधील जे नकारात्मक विचार आहेत ते गायीच्या दर्शनामुळे, गायीच्या पाठीवरून हात फिरविल्याने दूर सारल्या जातात, असे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितले आहे, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या. समारोपीय कार्यक्रमात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख