`आता नीलमताई मोर्चाचे क्रेडिट घेऊन जाणार`

`आता नीलमताई मोर्चाचे क्रेडिट घेऊन जाणार`

पुणे : गॅस सिलिंडर, पेट्रोल-डीझेलसह जीवनावश्‍यक वस्तूंच्या भडकलेल्या महागाई तसेच सरकारविरोधात शिवसेनेने मंगळवारी "लाटणे मोर्चा' काढला. यावेळी उशिराने आलेल्या आमदार नीलमताई गोऱ्हे या कौन्सिल हाॅलच्या प्रवेश द्वाराजवळ मोर्चात सामील झाल्या, त्यावर काही शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी "आता ताई मोर्चाचे क्रेडिट घेऊन जाणार' असे सांगत नाराजी व्यक्त केली. 

`मातोश्री`वरून आदेश आल्यामुळे आणि शिवसेनचे जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी हजेरी लावल्यामुळे विद्यमान शहराध्यक्ष विनायक निम्हण, माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे यांच्यासह श्‍याम देशपांडे, संजय भोसले यांच्यासह महिला पदाधिकारी मोर्चाला उपस्थित होते. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चामध्ये शिवसेनेच्या महिला आणि शिवसैनिकांनी चांगली गर्दी केली. पथनाट्य, सरकारविरोधात घोषणाबाजी, महागाईचा भस्मासुर आणि हातात लाटणे घेऊन बैलगाडीसोबत काढलेल्या मोर्चा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात होता.

सकाळी 11च्या सुमारास सुरू झालेला मोर्चा दुपारी एकच्या सुमारास विधानभवन येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आला. यावेळी विधानपरिषदेच्या सदस्या आणि सेनेच्या उपनेत्या डा गोऱ्हे यांनी गाडीमधून उतरून मोर्चामध्ये सामील झाल्या. यावेळी सेनेच्या काही शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी  `आम्ही कार्यकर्त्यांना घरातून बाहेर काढून मोर्चाला गर्दी आणायची', असे सांगत. "आता ताई या मोर्चाचे क्रेडिट घेऊन जाणार', अशी नाराजी व्यक्त केली. यावेळी सर्व नेत्यांनी मोर्चाला संबोधित केले.

कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियेबाबत `सरकारनामा`शी बोलताना नीलमताई म्हणाल्या, "मी सकाळी मुंबईवरून पुण्यात दाखल झाले. वाहतूक कोंडीमुळे शहरात यायला उशीर झाला. त्यामुळे नियोजित वेळेत पोहचू न शकल्यामुळे मोर्च्यात उशिरा सामील झाले. त्यामुळे काही पदाधिकारी व शिवसैनिकांना वाटत असेल की मी मोर्चाचे नेतृत्त्व केले, क्रेडीट घेतले. तर तसे नाही, माझ्यावर राज्यपातळीवर अनेक जबाबदाऱ्या आहेत. सर्वच ठिकाणी मी स्वतः जातीने हजर राहणे शक्‍य नसते. मुळात मोर्चाचे नियोजन आणि आयोजनामध्ये स्थानिक आणि शहर पातळीवरील नेतृत्व असते. मुळात मी शिवसैनिक आहे. त्यामुळे "शिवसैनिक हेच या मोर्चाचे नेतृत्त्व करीत असतात आम्ही तर केवळ प्रतिक आहोत. जर काही दुखावलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मनात अशा भावना येत असतील. तर त्यासाठी मी भविष्यात काळजी घेईन. जर त्यांना वाटत असेल की ताईंनी पहिल्यापासून मोर्चात असले पाहीजे, तर त्यांचे माझ्याबद्दलचे प्रेमाचे प्रतिक समजते.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com