अन्यायाला वाचा फोडणाऱ्या नीलम गोऱ्हे 

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाली असून त्यानिमित्त त्यांचा परिचय करून देणारा लेख .
neelam_ gorhe
neelam_ gorhe

मुंबई : स्त्री आधाराचा चेहरा असणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड होणे अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. राज्याच्या राजकारणात महिला प्रतिनिधींचे स्थान, मुख्य प्रवाहातील शिवसेना सारख्या राजकीय पक्षातील महिला आणि समाजकारण त्यातूनही महिलांच्या प्रश्नांवर चिकाटीने काम करत राहणे या तिन्ही पातळ्यांवर नीलम गोऱ्हे यांच्या संघर्षाची दखल घ्यावी लागेल.

महिलांवरील अत्याचार, अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी "स्त्री आधार केंद्र' या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत त्यांचा संपर्क निर्माण झाला. दलितांच्या प्रश्नांपासून महिलांच्या प्रश्नांबाबत समाजवादाची कास धरलेल्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेसारख्या उजव्या विचारसरणीच्या पक्षातही पक्षाला मानवेल एवढा का होईना साम्यवादी आवाज लावून धरला. 35 वर्षांपेक्षाही अधिक काळ समाजकारण आणि राजकारणाशी जोडलेल्या नीलम गोऱ्हे यांचा राजकीय मतदारसंघ कोणता तर तो सांगणे कठीण आहे. पण सामाजिक प्रश्नांवर काम करण्याची त्यांची मनसबदारी एवढी आहे की त्या मुख्य राजकीय पक्षाच्या मुख्य प्रवाहात असूनही हा प्रश्न पडत नाही.

लातूरमधील भूकंपग्रस्त महिलांसाठी काम, विकलांगासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांबरोबर त्या जोडलेल्या आहेत. हुंडाबळी, घटस्फोट, बलात्कार, पोटगी आणि महिला धोरण याबाबत नीलम गोऱ्हे यांनी मोठे काम केलेले आहे. महिलांच्या प्रश्नांबाबत नीलम गोऱ्हे राजकारणाच्या पलिकडे जाऊन भूमिका घेतात, ही त्यांचे ठळक वैशिष्ट नोंद घ्यावी असेच आहे.

विधानपरिषदेत महिलांवरील अन्यायाला वाचा फोडतानाही सत्तेत असूनही पहिला आवाज उमटतो तो नीलम गोऱ्हे यांचाच. महिलांच्या प्रश्नांवर काम करताना आलेल्या अनुभवांतून कायदे कुठे थिटे पडतात, अधिकारी नेमकी बोटचेपीपणाची भूमिका कुठे घेतात, एखाद्या घटनेला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी काय करण्याची आवश्‍यकता याची नेमकी मांडणी करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. उपसभापतीसारखे पद भूषवताना त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल.


संक्षिप्त परिचय
नाव : डॉ. नीलम दिवाकर गोऱ्हे
जन्म : 12 सप्टेंबर 1954 (पंढरपूर)
शिक्षण : बी. एस. ए. एम. (1992). बॅंकॉक येथील आशियाई लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक पदविका
अपत्ये : एक मुलगी
व्यवसाय : वैद्यकीय, सामाजिक कार्य
पक्ष : शिवसेना
सध्याचे राजकीय पदे : शिवसेना प्रतोद (विधानपरिषद), प्रवक्ता व उपनेत्या, शिवसेना-भाजपा समन्वयक (पुणे - सोलापूर जिल्हा)
संस्थापिका :  स्त्री आधार केंद्र व क्रांतिकारी महिला संघटना (पुणे)
छंद : लेखन, वाचन व महिलाविषयक कार्य.

सामाजिक कार्य
-पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार निवारण
-हुंडा, सामाजिक विषमता, महिला सक्षमीकरण, महिला संघटन आदी कार्यक्रम
-लातूर, उस्मानाबाद व गुजरात येथील भूकंपग्रस्तांना तसेच, 1993 मुंबई येथील बॉम्बस्फोटातील कुटुंबियांना मदत
-पूरग्रस्त तसेच 2006 मधील मुंबई बॉम्बस्फोटानंतर नेपाळी कुटुंबियांना मदतकार्य

राजकीय प्रवास :
शिवसैनिक म्हणून पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आदी भागात कार्यरत. 2015 पासून विधानपरिषदेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोद म्हणून कार्यरत.
2005 मध्ये शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती
-2007 पासून शिवसेना प्रवक्‍त्या
- 2010मध्ये शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती


लेखन व प्रकाशन :

-साहित्यिक वारसा राज्य कवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचा वारसा. सासरे विंदा करंदीकर यांच्याकडून साहित्यिक वारसा.
"उरल्या कहाण्या' हा कथासंग्रह. 
"विधानपरिषद माझे कामकाज : सहभाग कालखंड; सन 2002 ते 2007. 
"विधानपरिषद माझे कामकाज- कायदा सुव्यवस्था'; सन 2002 ते 2013, 
"विधानपरिषद माझे कामकाज- सहभाग कालखंड; 2007 ते 2013.
 शिवसेनेतील माझी 20 वर्षे आदी पुस्तकांचे लेखन

-'पूर्वा मुलींच्या अधिकाराची', 'महिला मंडळ मार्गदर्शक', 'अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण' आदी पुस्तकांचे संपादन.
-'वाईल बिहाईंड वॉल', 'लिगल स्टेटस ऑफ वुमेन इन महाराष्ट्र', 'वुमेन इन डिसिजन मेकिंग' आदी इंग्रजी पुस्तकांचे संशोधन व संपादन
-विविध वृत्तपत्रांमध्ये व नियतकालिकांमध्ये महिलाविषयक लेखांचे सतत लेखन करून समाज जागृतीचे कार्य.

पुरस्कार :
-"उरल्या कहाण्या' या कथा संग्रहास 1990 चा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार
-1994 मध्ये सर्वोत्कृष्ट कथेला किर्लोस्कर पारितोषिक प्राप्त
-1999 मुंबई महानगर पालिकेतर्फे उत्कृष्ट समाजसेविका पुरस्कार प्राप्त.
-विधानपरिषदेतील उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्राप्त 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com