Needhi Chaudhari should be suspended : Ashok Chavan | Sarkarnama

महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या निधी चौधरींना निलंबित करा: अशोक चव्हाण

सरकारनामा
रविवार, 2 जून 2019

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधी यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. हा देश गांधी विचाराने वाढला आणि गांधी विचारच या देशाला भविष्यातही तारणार आहे.

-अशोक चव्हाण

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो नोटांवरून काढून टाका, असे ट्विट करुन गांधीजींचा अवमान करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

निधी चौधरी यांच्या ट्‌वीटसंदर्भात वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, महात्मा गांधी यांचा अवमान करणारे हे ट्विट अत्यंत निषेधार्ह आहे. नोटांवरील महात्मा गांधी यांचे फोटो काढून टाकण्याची, रस्ते, संस्थांना दिलेली नावे काढण्याची तसेच जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत ही मागणी आणि 30-1-1948 साठी थॅंक्‍यू गोडसे, अशा आशयाचे अत्यंत खालच्या दर्जाचे ट्विट निधी चौधरी यांनी केले होते. या ट्विटमधून त्यांची वैचारिक पातळी समोर आली असून, अशा विचारांना वेळीच पायबंद घातला पाहिजे.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधी यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. हा देश गांधी विचाराने वाढला आणि गांधी विचारच या देशाला भविष्यातही तारणार आहे. पण काही विकृत विचारांचे लोक बापूंचे विचार पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. महात्मा गांधी व गांधी विचारधारेला संकुचित नजरेतून पाहणारा एक वर्ग आहे आणि त्याचीच री चौधरी यांनी ओढल्याचे दिसून येते. 70 वर्षात गांधी विचार पुसण्याचा प्रयत्न वारंवार झाला, गांधीजींना अवमानित करण्याचे प्रयत्नही झाले. मात्र अशा प्रवृत्तींना यश आलेले नाही आणि पुढेही येणार नाही. मात्र आता सरकारने आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. निधी चौधरींवर कारवाई होते की नाही, यावरून सरकार गांधी विचारधारेसमवेत आहे की गोडसेच्या विचारासोबत आहे, ते स्पष्ट होणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख