राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा २७ ऑगस्ट रोजी इंदापूरात...भरणेंसाठी महत्त्वाचा दिवस

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा २७ ऑगस्ट रोजी इंदापूरात...भरणेंसाठी महत्त्वाचा दिवस

वालचंदनगर : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे मंगळवार (ता.२७) रोजी इंदापूर तालुक्यात आगमन होणार आहे.  आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यासाठी  शिवस्वराज्य यात्रा महत्वाची ठरणार असून यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे नेते काय बोलणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. मंगळवारी (ता.२७) रोजी  शिवराज्य यात्रा  इंदापूर तालुक्यात पोहचणार आहे. तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात्रेचे तालुक्यात जंगी स्वागत करणार असून स्वागतानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा होणार आहे. खासदार डॉ.अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे , माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह दिग्जांच्या भाषणाच्या तोफा धडाडणार आहेत. 

राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेत कुरघोडी करून अंकिता हर्षवर्धन पाटील यांना स्थायी समितीवर येऊन दिले नाही. त्यासाठी राष्ट्रवादीच्या तालुक्यातील काही नेत्यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. त्यामुळे हर्षवर्धन आणि राष्ट्रवादी यांच्यातील संबंध आणखी कटू झाले आहेत.

राज्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस पक्षाची आघाडी झाल्यास इंदापूरच्या जागेचा पेच निर्माण होणार आहे. ३० एप्रिल २०१८ मध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंथुर्णेमधील शेतकरी मेळाव्यामध्ये वाटेल ते झाले तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादीची जागा सोडली जाणार नाही... भले आघाडी नाही झाली तरी बेहतर... हा अजित पवारांचा शब्द असल्याचे  जाहिरपणे सांगितले होते. तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मेळाव्यामध्ये  कॉग्रेसच भरणे मामांचा प्रचार करेल लय चितां करु नका, असे वक्तव्य  केल्यामुळे  राज्यामध्ये इंदापूरच्या जागेवरुन वादंग सुरु झाला होता.

सध्याच्या परस्थितीमध्ये  दोन्ही कॉग्रेसची आघाडी झाल्यास राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडणार नसल्याची चर्चा सुरु आहे. तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील ही भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षातून अनेक दिग्गज भाजप-सेनेमध्ये जात आहे. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे  तीन आमदार असून यामध्ये इंदापूरच्या दत्तात्रेय भरणे यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीसाठी इंदापूरची जागा महत्वाची आहे. इंदापूरचा गड राखण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेची सभा जोरदार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसण्यास सुरवात केली आहे.शिवस्वराज्य यात्रेच्या नियोजनासाठी शनिवार (ता.२४) रोजी आमदार दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीच  सभापती प्रवीण माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे,तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थित नियोजनाची बैठक आयोजित केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com