NCPs santosh mane congratulates his ex leader | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या संतोष माने यांनी आदित्य ठाकरेंना दिल्या मंत्रीपदाच्या शुभेच्छा !

सरकारनामा
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

शपथविधी समारंभ पार पडल्यांतर लगेच संतोष माने यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

औरंगाबादः राजकारणातील सारीपाटात कधी कोणत्या सोंगट्या बदलतील आणि कुणाला चेकमेट मिळेल याचा नेम नसतो. याचाच अनुभव सध्या शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले गंगापूरचे तरूण पदाधिकारी संतोष माने पाटील घेत आहेत. शिवसेनेत असतांना माने यांच्याकडे युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी हे पद होते.

या निमित्ताने त्यांचे युवासेना अध्यक्ष आणि आता ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. पण शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. आता संतोष माने यांनी आपल्या जुन्या नेत्याला मंत्रीपदाच्या शुभेच्छा देत जुन्या आठवणींना उजाळा दिला .  

गंगापूर-खुल्ताबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास संतोष माने इच्छूक होते. पण निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे विद्यमान भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यासाठी शिवसेने हा मतदारसंघ सोडला. 

त्यामुळे नाराज झालेल्या माने पितापुत्रांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने देखील संतोष माने यांना उमेदवारी देत बंब यांना टक्कर देण्याची खेळी केली. पण बंब यांच्यापुढे मानेंचा टिकाव लागला नाही.

पुढे राज्याच्या राजकारणात अशा काही घडामोडी घडल्या, की राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील त्यांचे सरकार सत्तेवर येऊ शकले नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या खेळीने राज्यात महाविकास आघाडी उदयाला आली आणि उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आज त्यांच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होऊन आदित्य ठाकरे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली.

शपथविधी समारंभ पार पडल्यांतर लगेच संतोष माने यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. माने यांनी  दिलेल्या शुभेच्छांची  राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख