राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस 'इलेक्‍शन मोडवर'  - NCP youth front on election mode | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस 'इलेक्‍शन मोडवर' 

चेतन देशमुख 
मंगळवार, 25 जून 2019

..

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या हालचाली पक्षीयस्तरावर वाढल्या आहेत. बैठका, भेटीगाठी, आढावा कार्यक्रम सुरू झाले असून, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने जिल्ह्यात जोरदार सुरुवात केली आहे. संघटन मजबूत करण्यासोबतच विविध मुद्दयांवर येत्या काळात आक्रमक भूमिका घेण्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नियोजन सुरु आहे. 

यवतमाळ विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडण्यात यावी, अशी मागणी आम्ही यापूर्वीच प्रदेशाकडे केली आहे. त्याअनुषंगाने आमचे नियोजन सुरू आहे. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्षांचा युवकांशी संवाद साधण्याचा हा कार्यक्रम आहे. असे असले तरी आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत, असे रायुकॉंचे जिल्हाध्यक्ष आशीष मानकर यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. 

आगामी विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. त्यापूर्वी संघटन मजबूत करण्यासोबतच शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहे. प्रवेशप्रक्रिया, वाढत चाललेली बेरोजगारी, युवकांच्या समस्या, शेतीविषयक प्रश्न यावर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी येत्या काळात रायुकॉ आंदोलन उभारण्याचीदेखील शक्‍यता आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आधीच बिगुल फुंकले आहे. प्रदेशस्तरावर झालेल्या बैठकीनंतर आता नेते जिल्हास्तरावर भेटी देणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी युवक पदाधिकाऱ्यांना शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात युवकांची मोट बांधण्याची तयारी सुरू केली आहे.

युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सूरज चव्हाण येत्या गुरुवारी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. स्थानिक कोल्हे सभागृहात दुपारी चार वाजता ते प्रमुख पदाधिकार्यांशी संवाद साधतील. आगामी निवडणुका, पक्षसंघटन या विषयावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष संदीप बाजोरीया, जिल्हाध्यक्ष व आमदार ख्वाजा बेग सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख