राष्ट्रवादीतर्फे एमएलसीसाठी अमोल मिटकरींचा पहिला नंबर लागणार  - NCP will give first priority to Amol Mitkari for MLC | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीतर्फे एमएलसीसाठी अमोल मिटकरींचा पहिला नंबर लागणार 

ज्ञानेश सावंत
रविवार, 15 डिसेंबर 2019

सरकार तीन पक्षांचे असल्याने विधान परिषदेच्या मोजक्‍याच आपल्या वाट्याला येणार असल्याने पक्षासाठी झटलेल्यांनाच संधी दिली जाईल

पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच विधान परिषदेवर जाण्यासाठी राष्ट्रवादीतील दीडडझन इच्छुकांनी "फिल्डिंग' लावली असताना मात्र, पहिल्या फेरीत पक्षाचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांना विधान परिषदेत घेणार आहे, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात जाहीर केले.

सरकार तीन पक्षांचे असल्याने विधान परिषदेच्या मोजक्‍याच आपल्या वाट्याला येणार असल्याने पक्षासाठी झटलेल्यांनाच संधी दिली जाईल, याकडेही पवार यांनी इच्छुकांचे लक्ष वेधले.

विधानसभा निवडणुकीत पराभव पत्कारलेल्या आणि गेली काही वर्षे संघटनात्क बांधणी करीत असलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांचा विधान परिषदेच्या सदस्यत्वावर डोळा आहे. तर काहीजण महामंडळाचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्याच्या तयारी आहेत. त्यामुळे सरकारमधील लाभाच्या पदावर वर्णी लावण्याच्या उद्देशाने राज्यभरातील राष्ट्रवादीच्या काही नेते मंडळींनी आतापासून छुप्या पध्दतीने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. त्यासाठी काही मंडळी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी घेऊन आपले नाव निश्‍चित होईल, यासाठी प्रयत्नशील आहेत. या राजकीय हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर अजितदादांनी पुण्यातील मेळाव्यात मिटकरी यांच्या कामाचे कौतुक करीत त्यांना आमदार करण्याचा आग्रह वरिष्ठांकडे धरणार आहे, असेही जाहीर केले.

पवार म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्यापाठोपाठ खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि मिटकरी यांच्या सभांना प्रचंड मागणी होती. काही मतदारसंघातून केवळ मिटकरी यांच्या सभांसाठीच प्रयत्न केले जात होत. या काळात मिटकरी यांनी सभा गाजविल्या आहेत. त्यांना विधान परिषदेत संधी देण्याबाबत माझा आग्रह आहे.''

दरम्यान, विधानसभेआधी लोकसभा निवडणुकीतही मिटकरी यांनी सभा घेतल्या. भाषणांमुळे त्यांच्या सभा प्रचंड गाजल्या आणि त्यानिमित्ताने ते राजकीय वर्तुळात चर्चेत आले. मात्र, आपल्या प्रत्येक सभांमध्ये मिटकरी विशेषत: शिवसेना नेत्यांवर तुटून पडायचे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची घोषणाही मिटकरी यांनी केली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख