"धस'क्‍यातून राष्ट्रवादी सावरेना

 "धस'क्‍यातून राष्ट्रवादी सावरेना

बीड जिल्हा परिषदेत सर्वाधिक उमेदवार व बहुमतापासून फक्त दोन पावले दूर असलेल्या राष्ट्रवादीला माजीमंत्री सुरेश धस यांच्या भूमिकेने सत्तेपासून कोसो दूर लोटले. अंतर्गत राजकारण, घराणेशाही, दुसरे नेतृत्व निर्माण होऊ नये यासाठी शह-काटशह देण्याच्या प्रयत्नात "तेल ही गेले, तूप ही गेले, हाती राहिले धूपाटणे' अशी काहीशी अवस्था राष्ट्रवादी कॉंग्रेसची झाली आहे. धस यांच्या धक्‍यातून राष्ट्रवादी अजूनही सावरली नसून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे भविष्यात जिल्ह्यात सुडाचे व कुरघोडीचेच राजकारण पहायला मिळण्याची अधिक शक्‍यता आहे.

माझ्या पत्नीचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोधा पक्षाच्या उमेदवारांना पैसे दिल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. त्यांचा रोख आमदार जयदत्त क्षीरसागर व त्याचे बंधू जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर होता हे स्पष्टच आहे. पत्नीचा झालेला पराभव, माजीमंत्री व जिल्ह्यातील पक्षाचा महत्वाचा नेता असून देखील सातत्याने डावलण्याचा झालेला प्रयत्न यातून धस यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना व विशेषतः धंनजय मुंडेंना धडा शिकवण्याचा निश्‍चय आधीच केला होता, याची चर्चा आता बीडमध्ये उघडपणे होऊ लागली आहे.

समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
2012 मध्ये बीड जिल्हा परिषदेत भाजपचे सदस्य पळवून सुरेश धस यांनी सत्ता मिळवण्यात महत्वाची भूमिका वठवली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीत धस यांनी खंजीर खुपसल्याची भावना त्यावेळी जिल्ह्यात बहुसंख्य असलेल्या वंजारा समाजात झाली होती. मुंडे घराण्यावर वंजारा समाजाची असलेली श्रध्दा पाहता ही नाराजी धस यांना पुढील काळातील राजकारणात चांगलीच भोवली. त्यावेळी केलेली चूक सुधारण्याचा प्रयत्न धस यांनी 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मदत करुन केल्याचे देखील बोलले जाते. धस यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांसह धनंजय मुंडे यांनी देखील पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढवला आहे. धस यांनी मात्र राष्ट्रवादीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. राज्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपची साथ दिली आहे, मग बीडमध्ये मी भाजपला मदत केली तर बिघडले कुठे असा त्यांचा सवाल आहे.

धस यांचे राजकीय वजन वाढले
प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर या सगळ्याच नेत्यांनी धस यांची हकालपट्टी करा असा धोशा लावला असला तरी जिल्ह्यातील राजकारणात सुरेश धस यांचा मात्र टीआरपी वाढल्याचे पहायला मिळते. राष्ट्रवादीकडून कारवाई झाली तरी धस यांच्यासाठी भाजपने दरवाजे खुले ठेवले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीची दुरावस्था आणि धस यांची उपद्रवशक्ती पाहता राष्ट्रवादीचे नेते तुर्तास धस यांच्या बाबतीत सबुरीची भूमिका घेतील असे बोलले जाते. असे झाल्यास राष्ट्रवादीत देखील त्यांचे वजन वाढणारच आहे. एकंदरीत भाजपला साथ देण्याचा धस यांचा सौदा त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला असे म्हणावे लागेल.

तटकरेंवरही तोफ डागली
जिल्हा परिषदेत भाजपला मतदान करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी पक्षातील नेत्यांना सांगितला होता, असे स्पष्ट करत धस यांनी धंनजय मुंडे यांनी केलेला विश्‍वासघाताचा आरोप फेटाळून लावला आहे. शिवाय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही धस यांनी तोफ डागली. तटकरे यांचा मुलगा आमदार आहे. आता मुलगी जिल्हा परिषदेत अध्यक्ष झाली. पुतण्यालाही राजकारणात त्यांनी स्थिर केले आहे. पक्ष मोठा करण्यासाठी मात्र कोणीच काही करत नाही असा करतांनाच तटकरे यांच्या घराणेशाहीवर देखील धस यांनी टिका केली. धनंजय मुंडे यांना झुकते माप देणाऱ्या तटकरेंवर धस यांचा राग असल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com