राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदासाठी आमदार पुत्रांची मोर्चेबांधणी

राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदासाठी आमदार पुत्रांची मोर्चेबांधणी

मुंबई : राज्यात  विद्यापीठातल्या सिनेट निवडणुकांसाठीच्या हालचाली सुरू असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीचीही चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्षाचे पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्‍त आहे. या पदावर आपल्या मुलांची वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादीच्या अनेक आजी-आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

यासाठी काही आमदारांनी आपल्या मुलांना विद्यार्थ्यांमध्ये जाऊन विविध प्रश्‍नावर काम करण्यासाठीचे धडेही देत असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांची गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने हे पद रिक्‍त राहिले आहे. 

दरम्यान, राज्यातील विद्यापीठांमध्ये नवीन विद्यापीठ कायदा अंमलात आल्याने विद्यापीठांमध्ये निवडून जाणाऱ्या सिनेट निवडणुकांचे बिगुल वाजले असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेची लगबग सुरू झाली आहे. राजकीय नेत्यांसोबतच कोकणातील आमदार भास्कर जाधव,माजी आमदार राजन पाटील आदी आजी-माजी आमदारांच्या मुलांची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. 

एकेकाळी बीड येथील माजी मंत्री व राष्ट्रवादीतून हकालपट्टी केले सुरेश धस यांच्या मर्जीतील राष्ट्रवादीचे तरूण कार्यकर्ते महेबूब शेखही यांचेही नाव या चर्चेत आहे. मुंबई आणि परिसरात मागील काही वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष म्हणून अनेक आंदोलने केलेल्या आणि विद्यार्थ्यांच्या शेकडो प्रश्‍नांना वाचा फोडलेल्या अमोल मातेले यांच्या नावालाही अनेकांनी पसंती दर्शवली आहे. 

मुंबई विद्यापीठात मातेले यांच्या नेतृत्वाखाली अनेक लढे उभारले गेलेले असल्याने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सिनेट निवडणुका नजरेसमोर ठेवून त्यासाठी निर्णय घ्यावा अशी अपेक्षा जिल्हा व तालुका स्तरावरील विद्यार्थी प्रतिनिधींकडून व्यक्‍त केली जात आहे. राज्यातील विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी जोरदार असल्याची माहिती एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सरकारनामा'शी बोलताना दिली. तर संघर्ष यात्रेच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष निवडीचे काम थोडे रखडले होते अशी कबुलीही देण्यात आली. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com