NCP MP MLA to give one month Salary to fight Agaisnt Corona | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार खासदार एक महिन्याचे वेतन 'कोरोना' प्रतिबंधासाठी देणार

संपत मोरे
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आणि खासदारांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे

पुणे : कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आणि खासदारांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

शरद पवार यांनी फेसबुक पोस्टवर ही माहिती दिली आहे. "कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या अभूतपूर्व संकट काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत ठामपणे उभा आहे." असे त्यांनी म्हटले आहे.

"एक सामाजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहायता निधी'साठी तसेच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'प्रधानमंत्री सहायता निधी'साठी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे." असे पवार यांनी सांगितले आहे.

"एक महिन्याच्या वेतनाचे धनादेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी जमा करावेत." असे आवाहन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व विधानसभा सदस्य आणि लोकसभा, राज्यसभा सदस्यांना केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख