NCP Mla Sunil Bhusara to Campaign for Shivsena Candidate in Mokhada | Sarkarnama

शिवसेनेला अडचणीत राष्ट्रवादीचा हात; मोखाड्यात सुनील भुसारा करणार शिवसेना उमेदवाराचा प्रचार

भगवान खैरनार
बुधवार, 1 जानेवारी 2020

राजकीय सलोखा कायम राहावा म्हणून विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन मोखाड्यातील जिल्हा परिषदेच्या तीनही जागांची निवडणूक न लढता बिनविरोध निवडणूक करण्याची संकल्पना मांडली होती. त्यास सर्वपक्षीय सहमती मिळाली होती.  फण आता ते स्वतः शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणार आहेत

मोखाडा : जिल्हा परिषद निवडणुकीत मोखाड्यातील तिनही जागा बिनविरोध निवडून आणण्यासाठी सर्वपक्षीय एकमत झाले होते; मात्र ऐनवेळी खोडाळा जिल्हा परिषद गटातील भाजपसह अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवार दमयंती फसाळे यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांनी आता शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतल्याने मोखाड्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

राजकीय सलोखा कायम राहावा, श्रम, वेळ आणि पैसा खर्च होऊ नये आणि जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण व्हावा, म्हणून विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन मोखाड्यातील जिल्हा परिषदेच्या तीनही जागांची निवडणूक न लढता बिनविरोध निवडणूक करण्याची संकल्पना मांडली होती. त्यास सर्वपक्षीय सहमती मिळाली होती. 

त्यादृष्टीने सोमवारी (ता. 30) आसे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे उमेदवार विश्‍वास चोथे यांनी माघार घेऊन राष्ट्रवादीचे हबीब शेख यांना निवडून आणले. तसेच पोशेरा गटात शिवसेनेच्या उमेदवार वंदना चोथे यांनी माघार घेतल्याने भाजपच्या राखी चोथे येथून बिनविरोध निवडून आल्या आहेत.

खोडाळा गटात मात्र भाजपच्या उमेदवार कुसुम झोले आणि अपक्ष उमेदवार रोहिणी फुफाणे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने शिवसेनेच्या उमेदवार दमयंती फसाळे यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे. सर्वपक्षीय सोईच्या राजकारणात शिवसेना अडचणीत सापडली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेताना काही काळ तणावही निर्माण झाला होता. तालुक्‍यात घडलेल्या या राजकीय घडामोडींमुळे समाज माध्यमातून उलटसुलट चर्चांना उधाण आले असून या घटनेमुळे भाजप आणि शिवसेनेतील वाद आता अधिक ताणला जाणार आहे.

ठरल्याप्रमाणे शिवसेनेच्या उमेदवारांनी राजकीय सलोखा राखण्यासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेऊन राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत. खोडाळा गटाची निवडणूक लादली गेली आहे. सर्वपक्षीय बैठकीत आमदार सुनील भुसारा आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी खोडाळा गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार दमयंती फसाळे यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे - अमोल पाटील, शिवसेना, मोखाडा तालुकाप्रमुख

मोखाड्यातील निवडणुका बिनविरोध होऊ नयेत म्हणून काही मंडळींनी राजकीय आणि सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र ठरल्याप्रमाणे शिवसेनेच्या उमेदवार दमयंती फसाळे यांना निवडून आणण्यासाठी स्वतः प्रचारात उतरणार असून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे - सुनील भुसारा, आमदार, विक्रमगड विधानसभा

लोकशाहीचा गळा घोटला जाऊ नये, मतदारांचा विश्‍वासघात होऊ नये आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून मी माझ्या मातोश्री कुसुम झोले यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. ही जागा परंपरागत भाजपचीच आहे. त्यामुळे येथून निवडून येण्याची आम्हाला खात्री आहे - मिलिंद झोले, भाजप कार्यकर्ते आणि उमेदवाराचे सुपुत्र
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख