' आता बाळा कोण म्हणणार...'

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वडिलांचे १६ जून रोजी दुःखद निधन झाले . आपले वडील कै . सतीश भाऊराव आव्हाड यांच्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेला हा हृदयस्पर्शी लेख -
' आता बाळा कोण म्हणणार...'

ला ठाऊक नाही... माझे आजोबा मुंबईत केव्हा आले. पण, गावी पडलेल्या दुष्काळामुळे त्यांच्या वडीलांनी म्हणजे माझ्या पणजोबांनी केवळ उपजिवीकेचं कोणतंही साधन उपलब्ध नसल्यानेच माझ्या आजोबांची रवानगी मुंबईला केली. अशा प्रकारे साधी अक्षरओळख नसलेल्या माझ्या आजोबांचं बिऱ्हाड दुष्काळाच्या झळा, जखमा अंगावर वागवत मुंबईत दाखल झालं. मुंबईत आपलं म्हणावं असं तेव्हा कुणीच नव्हतं. हजारो लोकांसारखंच... ते कुटूंब पोहोचलं बाँम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या आश्रयाला. 

15 जून, 1929 रोजी माझ्या वडीलांचा सतीश भाऊराव आव्हाड यांचा जन्म झाला. सुरूवातीची काही वर्षे गावाकडे काढल्यानंतर त्यांचीही रवानगी मुंबईला झाली. तोपर्यंत आजोबांनी मुंबई सेंट्रलच्या स्टेशनवर हमाल म्हणून बस्तान बसवले होते, बिल्लाही मिळवला होता. हमालाची खरी संपत्ती ही त्याची कर्मभूमी म्हणजे त्याचं हक्काचं रेल्वे स्टेशन. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन माझ्या आजोबांच्या घामानं त्यांच्या मालकिचाच बनला होता. तेच त्यांचं घर बनलं होतं. 

त्यामुळे वडीलांची मुंबईत राहण्याची व्यवस्थाही झाली. साडेचार वाजता पहिली गाडी आली की माझे आजोबा बाबांना उठवायचे. त्याकाळी मुंबई सेंट्रल हे जंक्शन होते, आणि पाण्याच्या मोठ्या होजपाईपने इंजिनमध्ये पाणी भरले जायचे. त्या पाईपाखाली अंघोळ उरकली की, बाबांच्या दिवसाला सुरुवात व्हायची.

मुंबई हळूहळू त्यांच्या अंगवळणी पडत होती. जसजसे कळायला लागले तसतसे मग मुंबई स्टेशन वरुन भायखळा स्टेशनवर ते पायीच जायचे. स्वत:च्या आईची भाजीची टोकरी डोक्यावर घ्यायची आणि परत मुंबई सेंट्रलला येऊन लॅमिंटन रोडच्या रस्त्यावर आजीला भाजीची टोकरी लावण्यासाठी मदत करायची व तेथून शाळेकडे प्रयाण करायचे. ही त्यांची ठरलेली दिनचर्या. 

म्हणायला आश्रय म्हणून मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन होतेच. अभ्यासाची जागाही तीच. एके दिवशी अचानक आजोबा गेले. पण जाताना माझ्या काकाला सांगून गेले कि, सटवा (सतीश) शिकेल तितका त्याला शिकवं. आयुष्याची जवळ-जवळ 20 वर्षे रेल्वे प्लॅटफॉर्मचा आश्रय घेऊन बाबा बी.ए. झाले. घरातला पहिला मुलगा लिहायला लागला, वाचायला लागला.

त्यातच माझी आई कै. लिलावती हिच्याशी त्यांचे लग्न झाले. माझी आई ही चौथी पास. पण, भयंकर खमक्या वृत्तीची. अफाट जिद्दीची रणरागिणी. माझे वडील सरकारी नोकरीत होते. पण आई काही केल्या समाधानी नव्हती. दूर्दम्य आशावाद बाळगाणाऱ्या माझ्या आईला माझ्या वडिलांनी म्हणजेच तिच्या नवऱ्यानं यशाची मोठी शिखरं करावीत अशी जबरदस्त इच्छा होती. त्यासाठी आईनं वडिलांना त्याकाळची सरकारी नोकरी सोडायला लावली. खाजगी कंपनीत नोकरी करायला लावली.

तोपर्यंत बाबा पार्ट टाईम एल. एल. बी. करुन सिद्धार्थ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या सहकार्य व आशीर्वादाने बी. ए. एल. एल. बी. झाले. त्यात त्यांनी पर्सनल मॅनेजमेंटचाही डिप्लोमाही मोठ्या मेहनतीने कमावला. या शिक्षणाच्या बळावरच त्यांनी नाशिक रोडला असलेल्या खाजगी कंपनीत नोकरी स्विकारली. पण नियतीच्या मनात क्रूर खेळ शिजत होता. अगदी अल्पावधीतच नाशिकची ती खाजगी कंपनी बंद पडली. आता कुठे काही नीट सुरू होऊ पाहत होतं. तोच मध्ये खोडता आला. वंजाऱ्याच्या जीवनातील वणवण पुन्हा एकदा आगीच्या लोळासारखी आयुष्य जाळू लागली.

वडिल नोकरीच्या शोधात मुंबईला परतले. परत घराचा प्रश्न आलाच? नाशिक रोडला बिटकोच्या मागे एक छोटेसे घर होते. मुंबईला नोकरीच्या मागे फिरताना घर म्हणून राहायला जागा नव्हती. भावाकडे जावं तर भावाचा संसार खूपच मोठा. तिथेही जागा मिळण्याची शक्यता शून्य असायची.

तेव्हाच एक देवासारखे पारसी कुटुंब धावून आले. ताडदेवला त्या कुटुंबाने बाबांना चाळीतल्या शेवटच्या खोलीत असलेल्या गॅलरीत झोपण्यासाठी जागा दिली. नात्याचं नाय, गोत्याचं नाय असं हे पारशी कुटुंब मात्र देवासारखे बाबांच्या मदतीला धावून आले. सकाळचा चहा आणि रात्रीच जेवणाची ही तिथेच सोय झाली. 

दोन वर्षांच्या अथक शोधानंतर अखेरीस बाबांना नोकरी मिळाली आणि आयुष्यच बदललं. तिथून अनेक कंपन्या बदलत शेवटी एका मल्टीनॅशनल कंपनीत कार्मिक विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शेवटचे काम पाहिले. ही त्यांची मेहनत होती. पण, त्यामागे माझ्या आईचा प्रचंड हात होता.

लग्नानंतरची दोन वर्षे नोकरीशिवाय काढली त्यामध्ये आम्ही तीन भावंडांना अशिक्षीत असून देखील शिवणकलेवर वर्चस्व असलेल्या आईने शिवणाचे क्लासेस घेऊन दोन वर्षे संसाराचा गाडा रेटला.

1997 साली ती गेली. राजा तिन्ही जगाचा आईविना भिकारी, असे थोर साहित्यिकांनी लिहून ठेवले आहे. पण घरामध्ये बाप नावाचा एक कर्तबगार त्यागी माणूस असतोच… आई गेल्यानंतर ते आई आणि बाबा ह्या दोन्ही भूमिकेत काम करत राहीले. त्यांच्या आयुष्यातील लीलाची कमतरता ही पावलोपावली त्यांना जाणवली. खरं सांगायच तर लीलाच्या जाण्याच्या दु:खातून ते स्वताला कधी सावरूच शकले नाही.

गेले 88 वर्षे आयुष्याच्या सर्व लढाया ते यशस्वीरीत्या जिंकले. समोर आलेल्या प्रत्येक आवाहानाला सामोरे जावून लीलाच्या मदतीने मात केली. ज्या घरामध्ये शिक्षणच नव्हते त्या घरामध्ये मी आणि माझ्या दोन्ही बहिणींना कॉन्व्हेंट शाळेत घालून इथपर्यंत आणून सोडले. गेले दिड वर्षे त्यांचा हॉस्पिटलमध्ये येणं-जाणं हा म्हणजे पाहुण्यांचाच कार्यक्रम होता. दर 15-20 दिवसांची एकदा हॉस्पिटलमध्ये जाव लागायच. पण, 24 तासात फिट होऊन ते परत यायचे.

त्यांचा वाढदिवस 15 जून रोजी होता. त्यासाठी त्यांची तयारी सुरु झाली होती. पण, काळाने घात केला 15 ला सकाळीच तब्येत थोडीशी खालावली आणि ते हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट झाले. तब्येत खालावत गेली. 15 जून ला प्रचंड क्रिकेट वेड असलेल्या माझ्या बाबांनी पूर्ण मॅच मोबाईलवर बघितली. आणि मला आता लवकर घेऊन चला घरी असा हट्ट धरला.

काळाच्या पोटात काय लपले होते कोणाला माहित. 16 जून ला सकाळी 4 वाजता माझा फोन वाजला. भाच्याचा फोन होता ह्रदयाचा एक ठोका चुकला पण, निरोप होता कि बाबा सिरीयस आहेत.ज्या माणसाने 88 वर्षात लढाई एक शूर योद्ध्याप्रमाणे आव्हाने अंगावर घेत जिंकली तोच माणूस अखेर मृत्यूसमोर हरला. 4 वा. 16. मि. अखेरीस त्यांची ज्योत मावळली.

गरीबी, परीश्रम, मेहनत पाचवीला पूजलेले असताना कधीही त्याचा बाऊ न करता मिळेल त्याच्यात आनंद व्यक्त करणं ही त्यांची सवय माझ्या कायम स्मरणात राहील. ते रविवारी मटणाच्या दुकानात जायच… पावकिलो मटण घ्यायचं. त्या खाटकाला दोन बहिणी आणि माझ्यासाठी तीन नळ्या मागायच्या ह्या सगळ्या आठवणी मनावर कोरलेल्या राहतील.

माझ्या आईचं तर काही वेगळच असायचं. तिची एकच गोष्ट सांगतो, तीला मी नास्तिक म्हणणार नाही. पण, स्वत:च्या कर्तुत्वावर जग जिंकायला शिका हे तीने माझ्या वडीलांनाही ठणकावून सांगितले होते. तीच्या गावरान भाषेत तीच एक वाक्य सांगावच लागेल. मी कधी ज्योतीषाकडे जायच म्हटलं, किंवा कोणी इतर जरी ज्योतीषाकडे जायचे म्हटले आणि ग्रह तारांच्या गप्पा मारल्या तर, ती पटकन म्हणायची चुलीजवळ हगायच आणि म्हणायच नशीबात होतं. आज ख-या अर्थाने घरावरच छत उडाल. एका संघर्ष यात्रेचा आज अखेर झाला…

मला आठवत नाही... पण कधीकाळी माझ्या आई वडीलांनी मला नावाने हाक मारली होती. जाहीर कार्यक्रमात एकटे असे कधी झालेल नाही. शेवटच्या काही दिवसांमध्ये एखादा दिवस मी घरी गेलो नाही कि बाळा तू आला नाहीस मला बघायला म्हणून वडील विचारायचे. पण मी ठरलो राजकारणात अडकलेला माणूस. अनेकदा मनात असून सुद्धा वेळ देणं शक्य होत नाही. पण, त्या विचारण्याची खंत कायम मनात राहायची.

आज अख्खं जग फादर्स डे सेलिब्रेट करताना... मी माझ्या वडिलांच्या स्मृती मनात साठवून त्यांना अभिवादन करतोय. सगळं काही आहे आज माझ्याजवळ पण ते दोन जीव जे माझ्यावर जीवापाड प्रेम करायचे तेच आता बाळा म्हणायला या पृथ्वीतलावर नाहीत...


*बाबा... विनम्र अभिवादन...*

तुमचा बाळा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com