NCP may split over the oppintment of Bahal as Leader of opposition | Sarkarnama

बहल यांच्या गटनेतेपदावरून राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर

उत्तम कुटे - सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 मार्च 2017

बहल यांची नियुक्ती कायम राहिली, तर राजीनामे देणे, स्वतंत्र गट स्थापन करणे वा भाजपमध्ये प्रवेश असे तीन पर्याय आमच्यासमोर असून त्याची कायदेशीर चाचपणी करण्यात येत आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून बहल यांची नियुक्ती रद्द होईपर्यंत त्यात यत्किंचितही बदल होणार नाही.

पिंपरी - "राष्ट्रवादी'च्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील
गटनेतेपदावरील योगेश बहल यांच्या नियुक्तीवरून हा पक्ष शहरात फुटीच्या
उंबरठ्यावर पोचला आहे.त्याचे संकेत मंगळवारी (ता.14) मिळाले.राष्ट्रवादीला पालिका निवडणुकीपूर्वी बसलेला "जोर का झटका' पुन्हा निवडणुकीनंतर बसणार का हे येत्या सहा दिवसांतच म्हणजे 20 तारखेपर्यंत स्पष्ट होणार आहे. बहल आणि मावळत्या सभागृह नेत्या मंगला कदम यांना सोडून उर्वरित 34 नगरसेवकांमधून कुणीही गटनेता दिला नाही,तर 22 नगरसेवकांचा गट पक्षही सोडून भाजपमध्ये जाऊ शकतो, असे या गटाच्या वतीने दत्ता साने यांनी आज सांगितले.

दरम्यान, महापौर निवडीच्या नव्या सभागृहाच्या विशेष सर्वसाधारण सभेला साने यांच्यासह या फुटीच्या उंबरठ्यावरील राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक उपस्थित नव्हते. बहल यांची नियुक्ती रद्द झाली, तर बंड थंड होईल, अन्यथा सुटलेला हा गाडा थांबणार नाही, स्फोट नक्की होईल, असे साने आज म्हणाले. बंड थंड न होता ते कसे टिकेल वा कुठले पाऊल त्यासाठी उचलावे लागेल, यासाठी कायदेशीर सल्ला घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले, "बहल यांची नियुक्ती कायम राहिली, तर राजीनामे देणे, स्वतंत्र गट स्थापन करणे वा भाजपमध्ये प्रवेश असे तीन पर्याय आमच्यासमोर असून त्याची कायदेशीर चाचपणी करण्यात येत आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून बहल यांची नियुक्ती रद्द होईपर्यंत त्यात यत्किंचितही बदल होणार नाही. आपल्या गटातील काही नगरसेवक हे महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी पक्षाच्या उमेदवारांसाठी सूचक आणि अनुमोदक असल्याने त्यांना आजच्या विशेषसर्वसाधारण सभेला जावे लागले''.

कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर साने व गट हा विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याची शक्‍यता आहे.त्यामुळे शहरातील राजकीय समीकरण बदलणार असून ते आणखी भाजपच्या पथ्यावर पडणारे ठरणार आहे. त्यातून पायउतार झालेली राष्ट्रवादी शहरात आणखी दुबळी होणार आहे. तसेच या गटाने, जर  भाजपमध्ये प्रवेश केला, तर राष्ट्रवादीची अवस्था शहरातील काँग्रेससारखीच होण्याची भीती आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख