पुण्यात अजितदादा राष्ट्रवादीची फेररचना करणार...तुपेंच्या जागी कोण येणार?

आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन संघटनेत बदल होण्याची चिन्हे
ajit pawar may changes faces in pune
ajit pawar may changes faces in pune

पुणे : विधानसभा निवडणुकीत चकमदार कामगिरी केलेल्या पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आता पुन्हा संघटनात्मक फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. संघटनात्मक कामगिरी उंचाविल्यानंतर आमदार चेतन तुपे यांना शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळे केले जाण्याचे संकेत पक्षाचे नेते अजित पवार यांनीच दिले आहेत. आमदार म्हणून मतदारसंघात पूर्णवेळ कामे करण्याकरिता तुपे यांना बदलून नवा शहराध्यक्ष नेमण्यात येणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादीचा कारभारी कोण ? याची उत्सुकता पक्ष संघटनेत आहे.

आगामी महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून पुणे शहर राष्ट्रवादीत बदल करण्याच्या हालचाली पक्षनेतृत्वाने केल्याचे सांगण्यात येत आहे. शहराध्यक्षांसह आणखी काही पदे बदलण्याचा अंदाज अजितदादांनी मांडताच नव्या पदांसाठी इच्छुकांनी "लॉबिंग'ही करण्यास सुरवात केली आहे.

खासदार वंदना चव्हाण यांच्यानंतर पावणेदोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद महापालिकेतील तेव्हाचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्याकडे आले. त्यानंतर काही निवडणुका तोंडावर असल्याने तुपे यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देत, सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठविला. आपल्या दिमतीला "जम्बो' कार्यकरिणी घेत, तुपे यांनी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचे जाळे विणले. विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाचे कारण देत, तुपे यांना विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीपासून लांब ठेवण्यात आले. तेव्हा तुपेंच्या जागी दिलीप बराटे यांची वर्णी लागली. त्यामुळे तुपे नाराज झाल्याची चर्चा पक्ष वर्तुळात होती.

त्यानंतर विधानसभा निवडणुकीत तुपेंना हडपसरची उमेदवारी मिळाली आणि ते आमदारही झाले. या निवडणुकीत तुपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला चांगले यश मिळाल्याने संघटनेत उत्साह आहे. नव्या आमदारांना मूळ जबाबदारी नेटाने पार पाडता यावी, यासाठी त्यांच्याकडील अतिरिक्त पदे काढण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. त्याचा हवाला देत पुढच्या काही दिवसांत संघटनेत बदल करण्यात येणार असल्याचे अजितदादांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शनिवारी स्पष्ट केले. त्यामुळे पक्षाची ताकद लक्षात घेऊन आता काही इच्छुकांनी शहराध्यक्ष होण्यासाठी मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे शहराध्यक्षपद माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची चर्चा रंगली आहे. त्याचवेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेताही ठरल्याप्रमाणे बदलला जाणार असल्याचेही दादांनी सांगितल्याने राष्ट्रवादीला नवा शहराध्यक्ष आणि महापालिकेत नवा विरोधी पक्षनेता राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com