बार्शी, माळशिरसमध्ये राष्ट्रवादीचे 'कमबॅक' 

माळशिरसमधून विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि बार्शीतून दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर या दोन्ही तालुक्‍यात नव्या उमेदवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने कमबॅक केले आहे.
sharad_pawar_vijaysinh_mohite
sharad_pawar_vijaysinh_mohite

सोलापूर : संस्थानिकांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर आजही टीका होते. पक्षाने कार्यकर्ता मोठा केला नाही तर मोठा असलेल्या नेत्याला सोबत घेऊन पक्ष मोठा केला, अशीच काहीशी टीका राष्ट्रवादीवर सातत्याने होत होती.

माळशिरसमधून विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि बार्शीतून दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर या दोन्ही तालुक्‍यात नव्या उमेदवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने कमबॅक केले आहे. आगामी निवडणुकीत येथील मतदारसंघात निकाल काय लागेल? हा पुढचा प्रश्‍न असला तरीही या दोन्ही तालुक्‍यांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निर्णायक अस्तित्व कायम राहणार हे निश्‍चित.  


माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव झाला. या पराभवानंतर खचलेल्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात उभारी मिळाली आहे. आज सोलापूर जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या महायुतीला राष्ट्रवादी कॉंग्रेस खंबीरपणे तोंड देत असल्याने आगामी काळातील लढाई ही महायुती विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशीच असणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 


करमाळा विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा देऊन राष्ट्रवादीने करमाळ्यातही आपली बाजू भक्कम केली आहे. माळशिरस येथे शेवटच्या क्षणी उत्तम जानकर यांच्यासारखा मास लिडर राष्ट्रवादीला मिळाला आहे.

जानकरांच्या उमेदवारीला डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. मोहिते-पाटलांच्या भाजप प्रवेशानंतरच जानकरांचा राष्ट्रवादी प्रवेश अपेक्षित होता. परंतु, या प्रवेशाला भाजपची उमेदवारी नाकारणे हे कारण ठरल्याने जानकरांनी विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त साधला. 


बार्शीतून दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माजी आमदार राजेंद्र राऊत राष्ट्रवादीत येतील, अशी अनेकांनी शक्‍यता वर्तविली. सोपल यांनी स्वत:च्या जिवावर विविध चिन्हावर आजपर्यंत आमदारकी मिळविल्याने बार्शीत राष्ट्रवादीला आणि पवारांना मानणारा वर्ग किती? याचे उत्तर कधीच मिळत नव्हते.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निरंजन भूमकर यांच्यासारख्या नव्या व युवा चेहऱ्याला संधी मिळाली. दोघांच्या लढाईत (सोपल-राऊत) हा कोण तिसरा? अशीच चर्चा कालपर्यंत होती. शरद पवारांच्या बार्शी दौऱ्यानंतर आता दोघांत भूमकर तिसरा याची देखील दखल घेतली जाऊ लागली आहे. ही दखल घेण्यास बार्शीत झालेली गर्दी कारणीभूत आहे. सोपल यांच्यानंतर बार्शी तालुक्‍यात कोण? या प्रश्‍नाचे उत्तरच आता बार्शी तालुक्‍याने या गर्दीतून मिळाले आहे. 


सोलापुरातील एन्ट्री फायद्याची 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतून सोलापूर शहरातील उत्तर, मध्य व दक्षिण या तीनही मतदारसंघात कॉंग्रेसचेच उमेदवार असायचे. राष्ट्रवादीची ताकद असूनही विधानसभा लढण्याची संधी मिळत नव्हती.

त्यामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा येत होत्या. यंदा कॉंग्रेसची अवस्था बिकट झाल्याने शहर उत्तरची जागा आघाडीतून राष्ट्रवादीला मिळाली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादीने माजी महापौर मनोहर सपाटे यांना मैदानात उतरविले आहे. आगामी वाटचालीसाठी आघाडीतून राष्ट्रवादीची सोलापुरात झालेली एन्ट्री फायद्याची ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com