नेत्यांच्या मराठवाडा दौऱ्याने राष्ट्रवादीला बळ मिळणार?

नेत्यांच्या मराठवाडा दौऱ्याने राष्ट्रवादीला बळ मिळणार?

औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील फडणवीस सरकारच्या विरोधात
मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरण, शेतकरी कर्जमाफी, तूर
खरेदीतील घोळ आणि नुकताच हातात घेतलेला समृध्दी महामार्गाचा मुद्दा ही सगळी शस्त्रे निरुपायोगी ठरली. उलट माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीच्या कथित चौकशीचे पिल्लू सोडून सरकारने राष्ट्रवादीच्या विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला.

सत्ता गेली आणि नेत्यांच्या मागे चौकशांचे शुक्‍लकाष्ट सुरु झाले, अशा परिस्थीतीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हवालदिल होणे स्वाभाविक होते. मराठवाड्याचा विचार केला तर नुकत्याच झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती, दोन महापालिका निवडणुकांवर नजर टाकली तर बीड, उस्मानाबाद व जालना हे तीन जिल्हे वगळता इतर ठिकाणी पक्षाची वाताहात झाल्याचे पहायला मिळते. यामुळे मानसिकरित्या खचलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मराठवाड्याचा दौरा केला. यातून राष्ट्रवादीला खरंच बळ मिळाले का? हा प्रश्‍न कायम आहे.

महिनाभरापुर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे औरंगाबादसह मराठवाडा दौऱ्यावर आल्या होत्या. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना स्वःताच्या पायावर उभे करण्यासाठी समाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मदत देऊ केली. या संपुर्ण दौऱ्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कमालीची मरगळ आणि पराभवामुळे खचलेली मानसिकता त्यांना प्रामुख्याने जाणवली. औरंगाबादच्या राष्ट्रवादी भवनातील मदत वाटप कार्यक्रमातील मोजक्‍या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने तर त्या अधिकच अस्वस्थ झाल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडा, खचू नका असे आवाहन देखील केले होते.

सुप्रिया सुळे यांचा दौरा संपत नाही तोच, राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मराठवाडा दौऱ्यांची घोषणा झाली. सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांमधील निरुत्साहाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतरच या दौऱ्याची आखणी केली गेल्याची चर्चा होती.

कर्जमाफीच्या घोषणेने दौरा फसला
मराठवाडा दौरा सुरु होण्यापुर्वी राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि संपाने वातावरण ढवळून निघाले होते. या निमित्ताने मराठवाड्यात कार्यकर्त्यांशी संवाद व सरकार विरोधाची धार आणखी तेज करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता. जालना येथून राष्ट्रवादीच्या दौऱ्याला सुरुवात झाली. नेत्यांनी कर्जमाफी, शेतीमालाला भाव यासह विविध मुद्यांवरून सरकारला धारेवर धरले. जालन्याचा दौरा आटोपून औरंगाबादेत नेत्यांचा ताफा येत नाही तोच सुकाणू समिती व सरकारच्या प्रतिनिधींच्या बैठकीत सरसकट कर्जमाफीला राज्य सरकारने तत्वता मान्यता दिल्याची घोषणा झाली.

मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संपात राजकीय पक्षांचा सहभाग असल्याचे सांगून राष्ट्रवादी व शिवसेनेवर निशाणा साधला होता. पण या कर्जमाफीचे श्रेय या दोन्ही पक्षांना मिळू नये याची काळजी घेत कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे विरोधकांच्या हातातील प्रमुख मुद्दा निघून गेला होता. मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांचा दौरा बाकी असतांनाच कर्जमाफीचा प्रश्‍न निकाली निघाल्याने राष्ट्रवादीचा दौरा फसला. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असतांना तातडीची पत्रकार परिषद घेऊन कर्जमाफी संदर्भात काही शंका व मुद्दे उपस्थित केले. 'तत्वत: व निकष या शब्दांमुळे कर्जमाफीबद्दल आपल्याला शंका वाटते',  म्हणत पवारांनी संभ्रमावस्था निर्माण केली. मग पुढे याच मुद्यावर उर्वरित सहा जिल्ह्यामधील कार्यकर्ता मेळाव्यात नेत्यांची भाषणे झाली.

पदे भोगणाऱ्यांना कानपिचक्‍या
मराठवाड्यातील दौऱ्यात अजित पवार यांनी स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्‍या दिल्या. वर्षानुवर्षे पद उपभोगत असलेल्या परंतु पक्षासाठी कसलेच योगदान न देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी आपल्या भाषेत ठणकावले. 'तुमच्याच्याने होत नसेल तर, बाजूल व्हा दुसऱ्याला संधी द्या', असा सज्जड दम त्यांनी भरला. 'आमदार राष्ट्रवादीचा, नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात तर जिल्हा परिषदेत सेना-भाजप सत्तेवर; हे कसे चालणार',  असा सवाल उपस्थित करत जालन्याच्या मेळाव्यात अजित पवारांनी जिथेराष्ट्रवादीचा आमदार, खासदार असेल त्या तालुका, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीची सत्ता असली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवाय ही त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे म्हणत गल्ली ते दिल्लीपर्यंत 'राष्ट्रवादी पुन्हा' ची हाक दिली.

आता समृध्दी महामार्गाचे हत्यार
कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल शरद पवारांनी शंका उपस्थित केली असली तरी हामुद्दा आता चालणार नाही याची जाणीव राष्ट्रवादीच्या नेत्यांना झाली आहे. नागपूर ते मुंबई या साडेसातशे किलोमीटर अंतराच्या समृध्दी महामार्गामुळ बाधित दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. अनेक शेतकऱ्यांनी औंरगाबाद व मुंबई येथे शरद पवारांची भेट घेऊन या प्रश्‍नावर लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यामुळेच दहा जिल्ह्यातील समृध्दी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची परिषद शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबादेत घेण्यात आली. या परिषदेला शेतकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद व शरद पवार हेच आपल्याला न्याय मिळवून देतील हा विश्‍वास पाहून राष्ट्रवादीने समृध्दीचा मुद्दा 'हायजॅक' केल्याचे बोलले जाते. शिवसेनेचा समृध्दीला असेला विरोध वरवरचा आणि दुट्टप्पीपणाचा असल्याचा सूर शेतकऱ्यांनी या परिषदेत आळवला होता. काँग्रेसने या प्रश्‍नावर बघ्याचीभूमिका घेतली आहे, त्यामुळे समृध्दीच्या निमित्ताने सरकार विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीला नवे हत्यार गवसले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com