अमोल मिटकरी यांना विधान परिषदेवर पाठविण्याचे अजित पवार यांचे संकेत - NCP Leader Ajit Pawar May Give Chance to Amol Mitkari on Maharashtra Council | Politics Marathi News - Sarkarnama

अमोल मिटकरी यांना विधान परिषदेवर पाठविण्याचे अजित पवार यांचे संकेत

मनोज भिवगडे 
सोमवार, 16 डिसेंबर 2019

'मी जर ठरवलं तर कुणी आमदार होऊ शकत नाही,' असे एका जाहीर सभेत अजित पवार बोलले होते आणि त्यांनी ते खरे करून दाखवले. मात्र, आता त्यांनीच अमोल मिटकरी या राष्ट्रवादीच्या तरुण नेत्याला विधान परिषदेचा आमदार करणार असल्याची घोषणा केली.

अकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील कुटासा येथील शेतकरी पूत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस प्रख्यात वक्ते म्हणून पुढे आलेले अमोल मिटकरी यांना विधान परिषदेवर पाठविण्याचे संकेत राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनी दिले आहेत. पुण्यात शनिवारी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात त्यांनी ही जाहीर घोषणा केली.

'मी जर ठरवलं तर कुणी आमदार होऊ शकत नाही,' असे एका जाहीर सभेत अजित पवार बोलले होते आणि त्यांनी ते खरे करून दाखवले. मात्र, आता त्यांनीच अमोल मिटकरी या राष्ट्रवादीच्या तरुण नेत्याला विधान परिषदेचा आमदार करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे विधिमंडळात राष्ट्रवादीची अकोल्यातून असलेल्या कोऱ्या पाटीवर अमोट मिटकरी यांच्या रुपाने एक आमदार लवकरच दिसून येईल.

दादांनीच दिली होती संधी!

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे सन २०१२ मध्ये प्रथमच भाषण करण्याची संधी मिळाली व तेथे केलेले भाषण खूप गाजले. त्यानंतर राज्यभरात व्याख्यान करणाऱ्या अमोलचे बारामती येथे शारदा व्याख्यानमालेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिटकरी यांचे भाषण ऐकल्यावर त्यांच्या वक्तृत्वशैलीचे कौतुक करीत सोबत काम करण्याची संधी दिली. मिटकरी यांनी त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून राज्यात सर्वाधिक ६७ सभा घेतल्या.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रवक्ते अमोल मिटकरी यांना विधान परिषदेवर घेण्याची घोषणा अजितदादांनी केली होती. त्यानंतर अकोल्यातील राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महानगराध्यक्ष शैलेश बोदडे, उपाध्यक्ष शुभम हागे पाटील आदींची उपस्थिती होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख