राष्ट्रवादी काॅंग्रेस - जनता दलाचं अखेर जमलं

..
shripatrao_shinde_hasan_mushrif
shripatrao_shinde_hasan_mushrif

गडहिंग्लज : शहराच्या हद्दवाढ क्षेत्रातील दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता ऍड. श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जनता दल आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्या (ता. 9) यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

जनता दलाकडून सर्वसाधारण जागेसाठी महेश ऊर्फ बंटी कोरी, तर सर्वसाधारण महिला जागेसाठी "राष्ट्रवादी'च्या सौ. शुभदा पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे.

बड्याचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील काही वसाहती पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाल्या आहेत. या वाढीव हद्दीच्या रूपाने पालिकेचा नववा प्रभाग तयार झाला असून, येथून दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत. यामुळे पालिकेत आता नगरसेवकांची संख्या 17 वरून 19 होणार आहे. 12 डिसेंबरअखेर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे.

या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांतील हालचालींनी वेग घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत जनता दलाने "राष्ट्रवादी'चे उमेदवार हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर वाढीव हद्दीच्या निवडणुकीतही हे दोन्ही पारंपरिक विरोधक एकत्र येतील, अशी शक्‍यता जाणकारांत चर्चिली जात होती. तशा हालचालीही दोन्ही पक्षांच्या प्रमुखांत सुरू होत्या. आघाडी करायची, यावरही पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाला होता. परंतु, सर्वसाधारण पुरुष जागेसाठीच दोन्हीकडून आग्रह होता. मात्र, जनता दलाने आधीच नगराध्यक्षा स्वाती कोरी यांचे पती महेश कोरी यांची उमेदवारी जवळजवळ निश्‍चित केल्याने या पक्षाकडून ही जागा सोडणे शक्‍य नव्हते. यामुळे "राष्ट्रवादी'च्या पदरात सर्वसाधारण महिलेची जागा पडण्याचीच अधिक शक्‍यता वर्तविली जात होती.

दरम्यान, आज सकाळी "राष्ट्रवादी'च्या प्रमुख कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुश्रीफ यांच्याकडे कागलला गेले होते. या वेळी झालेल्या चर्चेत सर्वसाधारण महिलेची जागा पक्षाच्या वाट्याला घेऊन आघाडी करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. चार दिवसांपूर्वीच मुश्रीफ यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची यादी पाठविली होती. याच इच्छुकांमधील शुभदा राहुल पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचेही सांगण्यात आले. कागलला गेलेल्या शिष्टमंडळात माजी उपनराध्यक्ष किरण कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश कोळकी, पालिकेचे विरोधी पक्षनेते हारून सय्यद, माजी नगराध्यक्ष वसंत यमगेकर, पक्षाचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे, युवकचे शहराध्यक्ष रामगोंडा पाटील, राहुल पाटील, रश्‍मीराज देसाई, अमर मांगले आदींचा समावेश होता.

शिवसेना, कॉंग्रेस काय करणार?
राज्याच्या धर्तीवर हद्दवाढीच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी समन्वयाची भूमिका घेणार असल्याचे शिवसेनेने यापूर्वीच जाहीर केले आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस व जनता दल आता एकत्र आले आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना व कॉंग्रेसची भूमिका काय राहणार, याकडे लक्ष लागले असून, हे दोन्ही पक्ष भाजपला एकाकी पाडण्याच्या हेतूने याच आघाडीत सहभागी होतात की स्वतंत्र भूमिका घेतात, हेही पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. दरम्यान, भाजपतर्फे आजच समरजित घाटगे यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. लवकरच उमेदवारी घोषित करून ताकदीने ही निवडणूक लढविण्याचा निर्धार श्री. घाटगे यांनी केला असून, नव्या प्रभागातील या लढती चुरशीने होण्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com