शिवेंद्रसिंहराजेंविरोधात राष्ट्रवादीकडे तगडे पर्याय!

शिवेंद्रसिंहराजे यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचा कऱ्हाड उत्तर, कोरेगाव आणि सातारा मतदारसंघांना जोडणारा राजकीय पूल ढासळला आहे.
शिवेंद्रसिंहराजेंविरोधात राष्ट्रवादीकडे तगडे पर्याय!

सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने आता या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. शिवेंद्रसिंहराजेंविरोधात एकतर कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, माजी सभापती अमित कदम अथवा आमदार शिंदे यांचे बंधू ऋषीकांत शिंदे असे तीन पर्याय राष्ट्रवादीपुढे उरले आहेत.  

भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजेंना उमेदवारी देणार पण त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कोणाला उभे करणार याची उत्सुकता आता ताणली आहे. 

सध्याच्या परिस्थितीत तर राष्ट्रवादीकडे शिवेंद्रसिंहराजेंना टक्कर देणारा उमेदवार सातारा, जावलीत नाही. पण यावर पर्याय काढल्यास कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांचा जावली तालुका होमपीच आहे. तसेच त्यांचा 36 गावांतही चांगला संपर्क आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांना साताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात उतरविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण त्यास शशिकांत शिंदेंचा विरोध आहे. त्यांच्यामते कोरेगाव मतदारसंघात मी सध्यातरी सुरक्षित असून येथून निवडुन येण्यास मला कोणतीही अडचण नाही. प्रत्येक वेळी मतदारसंघ बदलून निवडणुक लढणे मला सोयीचे होणार नाही, असे सांगून त्यांनी सध्यातरी साताऱ्यातून लढण्यास नापसंती व्यक्त केली आहे. पण पक्षश्रेष्टींच्या सूचनेनुसारच त्यांनी शालिनीताईंच्या विरोधात निवडणुक लढून त्यांना हद्दपार केले होते. त्याप्रमाणे पक्षाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंना धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादीकडून ऐनवेळी शशिकांत शिंदेंचा पर्याय ठेवला जाऊ शकतो. 

यासोबतच सध्या भाजपमध्ये असलेले अमित कदम हे यापूर्वी राष्ट्रवादीत होते. त्यांना राष्ट्रवादीने विविध पदे, जिल्हा परिषदेचे सभापती पदही दिले होते. तसेच ते अजित पवार यांचे समर्थक होते. त्यांचे आणि शिवेंद्रसिंहराजेंचे जमत नसल्याने त्यांना राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी दिली जाऊ शकते. सध्या अमित कदम ही पुन्हा राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत. यासोबतच आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषीकांत शिंदे हेही जावली तालुक्‍यात दांडगा संपर्क ठेऊन आहेत. त्यामुळे त्यांनाही शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात रिंगणात उरविले जाऊ शकते. तसे झाल्यास आमदार शिंदेंची ताकत ही ऋषीकांत शिंदेंना जावली व साताऱ्यातून मिळू शकेल. सध्या या मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत खासदारांना विरोध करणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंविरोधात सर्वसामान्य आमदार निवडून आणण्याचा शब्द उदयनराजे खरा करणार का, याची उत्सुकता आहे. 

विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून कऱ्हाड उत्तर, कोरेगाव आणि सातारा मतदारसंघांत कमळ फुलविण्याचे मनसुबे भाजप पूर्ण करणार आहे. या मनसुब्यांना अडविण्यासाठी उदयनराजे भोसले यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. ते शिवेंद्रसिंहराजेंविरोधात कोणाला रिंगणात उरविणार, हेही महत्वाचे आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com