कालव्यातून शेतीसाठी बिनधास्त  पाणी घ्या; कोणी अडवले तर मला सांगा  : अमरसिंह पंडित 

जायकवाडी धरणाचा पाणी साठा वाढल्यानंतर माजलगाव धरणाच्या हक्काचे पाणी उजव्या कालव्यातून सोडण्यात आले आहे. पिके वाळत असल्याने शेतकऱ्यांनी पाणी उपसा सुरु केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून यास मज्जाव करुन पाईपाईन फोडल्याची तक्रार शेतकऱ्यांनी अमरसिंह पंडित यांच्याकडे केली.
amarsinha_pandit
amarsinha_pandit

गेवराई (जि. बीड) : जायकवाडी धरणात ९० टक्क्यांहून अधिक पाणी साठ असल्याने उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाणी वापरास शासनाने प्रतिबंध करत अधिकाऱ्यांनी पाईपाईन फोडल्याचा प्रकारही घडला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी आक्रमक भुमिका घेत शेतकऱ्यांनी कालव्यातून शेतीसाठी पाणी घ्यावे, अडचण आल्यास थेट संपर्क करण्याचे आवाहन केले.

गेल्या वर्षीच्या तिव्र दुष्काळाने शेतकरी पुरता हवालदिल झाला. पिके हातची गेली आणि जनावरांच्या चारा - पाण्याची तजवीज करता करता शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले. त्यात यंदाही वरुणराजाने डोळे वटारल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मात्र, जायकवाडीत पाणी वाढल्याने जिल्ह्याच्या हक्काच्या दहा टिएमसी पाण्यापैकी काही पाणी उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात सोडले आहे. गेवराई तालुक्यातून जाणाऱ्या कालव्यातून शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यायला सुरुवात केल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यास मज्जाव केला. काही ठिकाणी पाईपलाईन फोडल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी अमरसिंह पंडित यांची भेट घेऊन केला. त्यानंतर अमरसिंह पंडित यांनी मुख्य अभियंता आणि इतरांशी चर्चा करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्याची मागणी केली. शेतातील खरीपाचे पिक वाया गेल्यानंतर पाण्याचे नियोजन आपण करणार का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला. शेतातील पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता असून आत्ता पाणी मिळाले नाही तर नंतर पाण्याची आवश्यकताच भासणार नाही असेही अमरसिंह पंडित यांनी अधिकाऱ्यांना समजावून सांगितले.
त्यानंतर जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कृषीपंपाद्वारे पाणी उचलण्याची तत्वतः मागणी मान्य केली.  चाऱ्या आणि वितरीकांमधून खरीपासाठीचे एक आवर्तन देण्याचेही त्यांनी मान्य केले असून लवकरच पाणी सोडण्याचे नियोजन अधिकारी स्तरावर करण्यात येणार असल्याची माहिती अमरसिंह पंडित यांनी दिली. सध्या शेतकर्यांनी तात्काळ कृषीपंपाच्या सहाय्याने कालव्यातून पाणी उचलावे मात्र चार्या आणि वितरीकांची कोणतीही तोडफोड अथवा कालव्याची हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कृषीपंपाद्वारे पाणी उचलण्यास कोणत्याही कर्मचार्यांनी मज्जाव केला अथवा अडथळा निर्माण केल्यास थेट आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अमरसिंह पंडित यांनी शेतकर्यांना केले आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com