NCP Finding New Face as Leader Of Opposition in Pune Municipa Corporation | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

पुणे पालिकेचा विरोधी नेता कोण होणार : योगेश ससाणे की लोणकर?

ज्ञानेश सावंत
शनिवार, 14 डिसेंबर 2019

या आधी महापालिकेतील पदे मिळालेल्या नगरसेवकांना संधी देऊ नका, असा नगरसेवकांचा वरिष्ठांकडे सूर आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीतील पडझडीनंतर भाजपने महापालिकेतील आपले सारे कारभारी बदलले असून, महापौर, सभागृहनेता, स्थायी समितीच्या अध्यक्षपदांवर तरुण नगरसेवकांच्या नेमणुका केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सभागृहात आक्रमकपणे काम करू शकणाऱ्या नगरसेवकाला विरोधी पक्ष नेता करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व्यूहरचना आहे.

पुणे : पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला घेरण्याची नवी रणनीती प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने आखण्यास प्रारंभ केला असून, सभागृहात भाजपवरील कुरघोड्यांचा डाव अधिक आक्रमपणे खेळण्यासाठी नवा विरोधी पक्ष नेता निवडण्याच्या हालचाली पक्ष नेतृत्व करीत आहे. भाजपमधील पदाधिकारी बदलांच्या अनुषंगाने हे पद नव्या दमाच्या नगरसेवकाकडे दिले जाण्याची चिन्हे आहेत. 

त्यासाठी काही नगरसेविकांच्या नावांचीही चर्चा आहे. मात्र, विरोधी पक्षाच्या खुर्च्चीत कोण बसणार ? याचा फैसला पक्षाचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीतील मेळाव्यात शनिवारी पुण्यात होण्याची शक्‍यता आहे.  महापालिकेत 41 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे विरोधी पक्षाचा मान आहे. सध्या या पदाची जबाबदारी दिलीप बराटे यांच्याकडे आहे. पक्षातील अनुभवी नगरसेवकांचा आकडा पाहता दर सव्वा वर्षांनी हे पद बदलण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे. 

त्यातूनच आमदार चेतन तुपे यांच्यानंतर हे पद बराटे यांच्याकडे आले. बराटे यांची मुदत संपल्याने विरोधी पक्ष नेता बदलण्याची मागणी पक्षातील काही नगरसेवकांनी अजितदादांकडे लावून धरली आहे. तेव्हाच, विरोधी पक्ष नेतेपदावर आपली वर्णी लागण्यासाठी इच्छुक नगरसेवकांनी 'फिल्डिंग'ही लावली आहे. माजी महापौर दत्ता धनकवडे, वैशाली बनकर, नंदा लोणकर, नगरसेवक योगेश ससाणे आणि सचिन दोडके यांच्या नावांची चर्चा आहे. 

परंतु, या आधी महापालिकेतील पदे मिळालेल्या नगरसेवकांना संधी देऊ नका, असा नगरसेवकांचा वरिष्ठांकडे सूर आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीतील पडझडीनंतर भाजपने महापालिकेतील आपले सारे कारभारी बदलले असून, महापौर, सभागृहनेता, स्थायी समितीच्या अध्यक्षपदांवर तरुण नगरसेवकांच्या नेमणुका केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सभागृहात आक्रमकपणे काम करू शकणाऱ्या नगरसेवकाला विरोधी पक्ष नेता करण्याचा पक्षाची व्यूहरचना आहे. दुसरीकडे, पक्षातील बहुतांशी नगरसेवकांच्या गाठीभेट घेत, पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न ससाणे आणि लोणकर करीत आहेत. 

या पदासाठी आपले पारडे जड असल्याचा सर्व दावा इच्छुक करीत असले तरी, अजितदादा कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याची उत्सुकता आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडीनंतर अजित पवार हे राष्ट्रवादीसह राजकीय वर्तुळात चर्चेत आले. अचानक भाजपसोबत जाण्याबाबत त्यांनी वरवरचा खुलासा केला. मात्र, आपल्या भूमिकेसंदर्भात "योग्य वेळी बोलेन'', असे सांगत अजितदादांनी अजूनही 'सस्पेन्स' कायम ठेवला. या घडामोडीनंतर पुण्यातील पक्षाच्या कार्यकर्ते गोंधळात पडले होते. या पार्श्‍वभूमीवर अजितदादा आपल्या समर्थकांना भेटणार आहेत आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत दुपारी चार वाजता हा मेळावा होणार आहे.

हे देखिल वाचा - नागपूर अधिवेशनानंतर होणार मंत्रीमंडळ विस्तार - अजित पवार

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख