ncp expells four corporators in ratanagiri | Sarkarnama

कुराणावर हात ठेवून शपथ घेतल्यास राष्ट्रवादी कारवाई मागे घेणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

 "हा निर्णय जिल्हाध्यक्षांना मान्य नसेल तर त्यांनी माझ्यावर कारवाई करावी. त्याला सामोरे जाण्यास मी समर्थ आहे,'' असे मयेकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

रत्नागिरी : "विधानसभा निवडणुकीसह नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न करता विरोधी पक्षाला साथ देत विश्वासघात करणाऱ्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे तालुकाध्यक्ष, पालिका गटनेते सुदेश मयेकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. कारवाई करण्याच्या मताचा मीही नव्हतो; परंतु कार्यकर्त्यांनी हकालपट्टी करा, असा आग्रहच धरल्यामुळेच हकालपट्टीचा निर्णय घ्यावा लागल्याचे मयेकर यांनी सांगितले.

येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये, नीलेश भोसले, रामभाऊ गराटे आदी उपस्थित होते. रत्नागिरी पालिकेत राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक आहेत. त्यापैकी कौसल्या शेट्ये, उज्ज्वला शेट्ये, मुसा काझी, मिरकरवाडा येथील सोहेल साखरकर यांना लेखी राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले होते; मात्र पक्षाच्या नोटिसीला एकाही नगरसेवकाने लेखी उत्तर दिलेले नाही. त्यामुळे गटनेते मयेकर यांनी आक्रमक भूमिका घेत चौघांची पक्षातून हकालपट्टी केली.

मागील दीड वर्षापासून ते नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत. विधानसभा निवडणूक, थेट नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत त्या चौघांनीही पक्षाविरोधात काम केले. कोकणनगर येथे विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मुसा काझी यांनी बैठकीचे आयोजन केले होते. मिरकरवाडा येथेही सुहेल यांनी अप्रत्यक्ष प्रचार केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत कार्यकर्त्यांकडून सातत्याने विचारणा होत होती. बुधवारी (ता. 15) तालुका कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात चारही नगरसेवकांची हकालपट्‌टी करण्याचा निर्णय एकमताने झाला. तत्पूर्वी त्या चारही नगरसेवकांच्या संदर्भात जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे चर्चा केली होती. त्यांचा कारवाईला विरोध होता, असे मयेकर यांनी सांगितले. 

ते म्हणाले, "त्या चार नगरसेवकांनी गद्दारी केल्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. ते पक्षाशी प्रामाणिक राहिले नाहीत. पक्षाचे नुकसान करणाऱ्यांना पक्षात स्थान देऊ नका, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. ज्यांना पक्षाने नगरसेवक केले ते पक्षाशी प्रामाणिक राहत नसतील तर त्यांचा काहीच उपयोग नाही, अशी सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांच्या भावनेचा आदर राखत ही कारवाई केली. पक्षविरोधी काम केल्याचे मुसा, सुहेल नाकारत असतील तर त्यांनी कुराणावर हात ठेवून शपथ घ्यावी. तसे केले तर मी कारवाई त्वरित मागे घेईन.''
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख