ncp considers four names for shirur ls seat | Sarkarnama

आढळरावांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडे चार शिलेदार! कोण ठरणार दमदार?

भरत पचंगे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

शिक्रापूर : शिरूर लोकसभा मतदारसंघात तब्बल तीन निवडणुकांत राष्ट्रवादीला पाणी पाजणारे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीकडे चार नावांवर विचार सुरू आहे. यापेकी कोणता उमेदवार निवडून येईल याची खात्री करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे.

शिक्रापूर : शिरूर लोकसभा मतदारसंघात तब्बल तीन निवडणुकांत राष्ट्रवादीला पाणी पाजणारे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीकडे चार नावांवर विचार सुरू आहे. यापेकी कोणता उमेदवार निवडून येईल याची खात्री करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे.

शिवसेना आणि भाजप यांची लोकसभेसाठी युती निश्चित मानली जात असल्याने भाजपमधील इच्छुकांनी आपली धावपळ थांबविली आहे. दुसरीकडे आढळरावांनी आतापासूनच मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडे अद्याप सामसूम आहे.
 
आढळरावांच्या विरोधातील उमेदवाराला तयारी करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून उमेदवार आगामी आठ दिवसांत जाहीर करणार असल्याची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी करून दहा दिवस झाले आहेत. अद्याप पक्षाने उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार माजी आमदार विलास लांडे, देवदत्त निकम यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या नावांची पक्षात गांभीर्याने चर्चा सुरू आहे.  यातील एकाच्या नावावर सर्वेक्षण करुनच निर्णय लवकर घेण्याचे संकेत मिळत आहेत.
  
आपल्या राजकारणाची सुरवात राष्ट्रवादीतून सुरू करुन पुढील प्रत्येक निवडणूकीत राष्ट्रवादीच्या विरोधातच शिवसेनेकडून चढत्या मताधिक्याने खासदारकी जिंकणारे शिवाजीराव आढळराव यांच्याविरोधात राष्ट्रवादीला योग्य पर्याय नाही, हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना खटकणारी गोष्ट आहे. यावेळी शिरूरची जागा पक्षपातळीवर गांभिर्याने घेतल्याने राज्यात सर्वात पहिल्यांदा शिरूरची उमेदवारी जाहीर करण्याचे सुतोवाच सुप्रिया सुळे यांनी दहा दिवसांपूर्वी नारायणगाव येथे केले. 
 
भोसरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आणि आढळराव यांच्या विरोधात २००९ मध्ये लढत दिलेले विलास लांडे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे हे गावकीभावकीचा विचार करून लांडे यांना थेट विरोध करणार नाहीत, अशी चर्चा कानावर आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारासाठी लांडगे हे जिवाचे रान करणार नाहीत. अप्रत्यक्षरित्या लांडे यांना मदत करून आपला विधानसभेचा मार्ग खुला ठेवतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

मागील निवडणुकीत कमी वेळात ब-यापैकी लढत दिलेले आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांना यावेळी प्रचाराला वेळ आणि सहानुभूतीही मिळू शकते. पक्षाकडे लोकसभेची अधिकृतपणे उमेदवारी मागणारे ते सध्या तरी एकमेव आहेत.  शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार अशोक पवार व प्रदीप कंद यांच्यातील विधानसभेच्या उमेदवारीचा वाद मिटविण्यासाठी कंद यांना लोकसभेची उमेदवारीची संधी द्यावी, असा एका प्रवाह आहे. त्यामुळे शिरूर विधानसभेची जागाही पक्षाला एकजुटीने जिंकता येईल, असा त्यामागे होरा आहे.

चौथे नाव हे मंगलदास बांदल यांचे आहे.  शिक्रापूरच्या सरपंचपदापासून राजकारणाला सुरवात करुन भाजपाकडून शिरुर-हवेलीची विधानसभा लढविणारे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापतीपद राष्ट्रवादीकडून मिळवून बांदल यांनी आपली उपयुक्तता कायम ठेवली आहे. निरनिराळ्या पक्षांतील वरिष्ठ नेत्यांच्या जवळ जाण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते उमेदवारी आणू शकतात, असा समज त्यांच्या कार्यकर्त्यांत नेहमी असतो. आता या चौघातील कोणत्या नावावर राष्ट्रवादीचे नेते शिक्कामोर्तब करणार हे येत्या काही दिवसांत कळेल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख