ncp congress alliance | Sarkarnama

राज्यात कॉंग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी होणार - अशोक चव्हाण

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 मार्च 2017

नांदेड ः सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी त्याचबरोबर राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्यासाठी राज्यात जिथे जिथे शक्‍य आहे तिथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी दिली. 

नांदेड ः सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी त्याचबरोबर राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्यासाठी राज्यात जिथे जिथे शक्‍य आहे तिथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी दिली. 

नांदेड जिल्हा परिषदेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून आघाडीला राष्ट्रीय समाज पक्ष व एका अपक्षाचाही पाठिंबा असल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक आमदार सतीश चव्हाण यांच्यासह कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आजी - माजी आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तसेच धर्मनिरपेक्ष पक्षांनी एक येण्यासाठी देशपातळीवर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली आहे. तसेच राज्यात मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केली असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील चर्चा केली आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडीबाबत काही ठिकाणी अडचणी आल्या असल्या तरी त्यातून मार्ग काढण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करत आघाडी झाली तर सत्ता स्थापन करता येऊ शकते. त्यामुळे त्याची सुरूवात नांदेडपासून सुरू केली असल्याची माहितीही श्री. चव्हाण यांनी दिली. 

भारतीय जनता पक्षाकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करून श्री. चव्हाण म्हणाले की, भाजपने गोवा आणि मणिपूर मध्ये सत्तेचा गैरवापर केला असून तो लोकशाहीला मारक आहे. त्याचबरोबर स्वतःची ताकद नसताना देखील अनेकांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा खटाटोप सुरू आहे तसेच येनकेन प्रकारे सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. त्यामुळेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तसेच धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून एकत्र येण्याचा विचार सुरू असल्याची माहितीही श्री. चव्हाण यांनी दिली. 
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील इव्हीएम मशीनच्या बाबतीतही अनेक ठिकाणाहून तक्रारी येत आहेत त्यामुळे उपस्थित करण्यात आलेल्या शंका लक्षात घेऊन त्याचीही स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत या इव्हीएम मशिनचा वापर करण्यात येऊ नये, अशी मागणीही श्री. चव्हाण यांनी केली आहे. 
शिवसेनेलाच भाजप नको आहे 
नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत राज्यात काही ठिकाणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनाही एकत्र आल्याचे दिसून आले. त्यामुळे याबाबत विचारले असता श्री. चव्हाण म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेलाच भाजप नको आहे. राज्यात भाजपशिवाय शिवसेना मदत करण्यासाठी पुढे येत असेल तर आम्ही देखील सहकार्य घेऊ किंवा देऊ. मात्र याबाबत अजून राज्यपातळीवर कोणताही धोरणात्मक निर्णय झाला नाही. राज्यात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्ष सत्तेत नको म्हणून शिवसेनेनेच स्वतःहून मदतीचा "हात' पुढे केला असल्याचेही श्री. चव्हाण यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख