ncp congress | Sarkarnama

कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी पवार - चव्हाण यांच्यात चर्चा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

नांदेड ः राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शंकरराव चव्हाण पुण्यतिथीनिमित्य रविवारी शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयास भेट देऊन पाहणी केली. या वेळी श्री. पवार यांच्या समवेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

नांदेड ः राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शंकरराव चव्हाण पुण्यतिथीनिमित्य रविवारी शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयास भेट देऊन पाहणी केली. या वेळी श्री. पवार यांच्या समवेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर श्री. पवार हे नांदेडला आले होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे श्री. पवार यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्‍टर ऑफ लेटर्स (डिलीट) ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जुन्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला. 
या संदर्भात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, अशी आमची सुरूवातीपासून इच्छा आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील दहा ते बारा जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली तर सत्ता येऊ शकते. त्यामुळे आघाडीबाबत आमची श्री. पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी देखील ती तत्त्वतः मान्य केली आहे. आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतही चर्चा होणार असल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली. ज्या ठिकाणी ज्यांच्या जागा जास्त त्यांचा अध्यक्ष होईल त्याचबरोबर जिथे कॉंग्रेसला पाठिंबा हवा तिथे राष्ट्रवादीचा पाठिंबा आणि जिथे राष्ट्रवादीला पाठिंबा हवा तिथे कॉंग्रेसचा पाठिंबा राहील, अशी माहितीही त्यांनी दिली. 
मुंबई महापालिकेसाठी आम्हाला शिवसेना किंवा भाजप या दोन्ही पक्षाकडून काहीच विचारणा झाली नाही त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्न सध्या तरी उद्भवत नाही. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमातूनच आम्ही देखील आपल्यासारखी चर्चा ऐकत असल्याचेही श्री. चव्हाण यांनी सांगितले. जातीयवादी पक्षासोबत आघाडी किंवा युती करण्याचा

आमचा सुरवातीपासूनच विरोध असल्याचे सांगून श्री. चव्हाण म्हणाले की, मुंबईत आमच्या जागा कमी आहेत त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही की पाठिंबाही देऊ शकत नाही त्याचबरोबर आम्हाला कुणाचा प्रस्तावही आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून या जर - तरच्या गोष्टी असल्याचे सांगितले. 
कॉंग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी राजीनामा दिला असला तरी सध्या तेच काळजीवाहू अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्या जागेवर आमदार भाई जगताप यांची नियुक्ती किंवा प्रभारी अध्यक्ष करण्याचा प्रश्न नाही. भाई जगताप यांना देखील सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांनी अध्यक्ष केले असले तर सांगता येत नाही. मुंबईच्या अध्यक्षांची निवड पक्षश्रेष्ठी करतील आणि ते ठरवतील तोच अध्यक्ष होईल, अशी माहितीही श्री. चव्हाण यांनी दिली. यावेळी कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख