भुजबळ कुटुंबीयांसाठी नाशिक मध्य मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा?

Shefali Bhujbal - Samir Bhujbal - Gajanan Shelar
Shefali Bhujbal - Samir Bhujbal - Gajanan Shelar

नाशिक : दोन्ही कॉंग्रेसचे जागावाटप निश्‍चित झाले आहे. यामध्ये परस्पर सहमतीने काही जागांची अदलाबदल होईल याला वरिष्ठ नेत्यांनीच दुजोरा दिला आहे. त्यामुळे मालेगाव बाह्य आणि नाशिक मध्य हे मतदारसंघ एकमेकांना दिले जाण्याची शक्‍यता आहे. शहरातील नाशिक मध्य मतदारसंघ कॉंग्रेस ऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसला जाणार अशी चर्चा जोरात आहे. त्यामुळे दलित व ओबीसी बहुल मतदारसंघातून भुजबळ कुटुंबीय अथवा अन्य ओबीसी चेहरा उमेदवार असेल असे संकेत आहेत.

कॉंग्रेस पक्षाने केलेल्या सर्व्हेक्षणात दलित मतदारांचा निर्णायक कल असलेल्या यादीत नाशिक मध्य मतदारसंघाचा समावेश आहे. मुस्लीम व ओबीसी मतदारांची लक्षणीय संख्या आहे. तरीही गेल्या दोन निवडणूकांत कॉंग्रेसचा उमेदवार येथून पराभूत झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर जागा वाटपाच्या यादीत हा मतदारसंघ अद्याप अनिर्णीत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्‍या नेत्यांशी झालेल्या चर्चेत मध्य मतदारसंघात तगडा उमेदवार उपलब्ध आहे असे संकेत दिले आहेत. त्यामुळे कालपर्यंत भाजपला अनुकुल असलेल्या या मतदारसंघात सध्या राजकीय चित्र बदलाची चिन्हे आहेत. 

भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांच्या विरोधात पक्षातील सोळा जणांनी उमेदवारी मागितली आहे. त्यांना पक्षातील माजी महापौर व माजी आमदार वसंत गिते यांसह विविध इच्छुकांचा तीव्र विरोध आहे. अशा स्थितीत भाजपची उमेदवार देतांना कसोटी असेल. त्यात चुक झाल्यास ऐनवेळी राष्ट्रवादीकडून आयात अथवा पक्षातील तगडा उमेदवार दिला जाऊ शकतो. सध्या नगरसेवक गजानन शेलार, माजी खासदार समीर भुजबळ किंवा शेफाली भुजबळ यांसह संपर्कात असलेला भाजपचा नाराज उमेदवार राष्ट्रवादीच्या डोळ्यापुढे आहे.  त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर हा मतदारसंघ अचानक चर्चेत आला आहे.

हा मतदारसंघ सातत्याने परिवर्तनाच्या बाजुने कौल देत आला आहे. 2004 मध्ये येथे कॉंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव, 2009 येथून "मनसे"चे वसंत गिते विजयी झाले. 2014 मध्ये भाजपच्या देवयानी फरांदे विजयी झाल्या आहेत. 2009 मध्ये मनसेचे गिते यांना 62,167 तर कॉंग्रेसच्या तत्कालीन आमदार डॉ.शोभा बच्छाव यांना 30,998 मते मिळाली. 2014 मध्ये भाजपच्या फरांदे यांना 61,548 तर मनसेचे तत्कालीन आमदार गिते यांना 33,276 मते मिळाली. यावेळी सर्वच पक्षांचे उमेदवार होते. त्यात कॉंग्रेसचे शाहू खैरे यांना 26,393, शिवसेनेचे अजय बोरस्ते यांना 24,549 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विनायक खैरे यांना 7,095 मते मिळाली होती. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना 94,429 तर राष्ट्रवादीच समीर भुजबळ यांना 56,459 मते मिळाली. वंचित आघाडीचे पवन पवार यांना 15,405 तर अपक्ष माणिक कोकाटे यांना 5,964 मते होती. निवडणुकांचा हा इतिहास पाहता येथील मतदारांचा कल सातत्याने बदलत आला आहे. त्यादृष्टीने यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथे जागा बदलाचा प्रयोग केल्यास रंगतदार लढत होणार हे मात्र नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com