शरद पवारांवरील आरोपाचा जनता सूड घेईल :  अशोक गावडे

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, अमोल मिटकरे, ज्येष्ठ नेते नवाब मलिक असे स्टार प्रचारक प्रचारासाठी येणार आहेत.-अशोक गावडे
ashok Gavde
ashok Gavde

नवी मुंबई : राष्ट्रवादीतून ज्यांना जायचे होते, ते गेल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पक्षबांधणी करण्यात मला यश आले. हे फक्त राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पेरलेले होते. ते पीक आज मी नवी मुंबईत घेत आहे. जनता-जनार्दन पक्षांतर करणाऱ्यांचा सूड नक्की घेईल, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अशोक गावडे यांनी  विशेष मुलाखती दरम्यान केली.

 नवी मुंबईत गेली अनेक वर्षे न सुधारलेली आरोग्य व्यवस्था व रखडलेली शिक्षण व्यवस्था सुधारण्याचे काम आपण करणार असल्याचा निर्धार गावडे यांनी यावेळी बोलून दाखवला. फसवणुकीचे प्रसंग टाळण्यासाठी कायदे सल्लागार मंडळाची स्थापना, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र व सांस्कृतिक मंडळ स्थापन करून शहराला सांस्कृतिक चेहरा देण्याचे काम करणार असल्याचे आश्‍वासन गावडे यांनी दिले.

घाणेरडे राजकारण
राज्यात आणि देशात सध्या सुरू असलेल्या राजकारणाला वेगळे वळण लागत चालले आहे. राजकारण केव्हाही मैत्रीपूर्ण खेळले जाते. मात्र सध्या कुठे तरी एखाद्याची खपली काढून त्याला अडचणीत आणून घाणेरड्या पद्धतीने राजकारण खेळले जात आहे. त्याभीतीपोटी मी जे काही समाजकारणात अथवा राजकारणात झालेली चूक अथवा परिस्थितीजन्य घेतलेला निर्णय चुकीचा अथवा बरोबर असू शकतो. मात्र तो कायद्याच्या फूटपट्टीवर तपासून त्या व्यक्तीला शिक्षा करण्याचे काम सध्याच्या सरकारतर्फे केले जात आहे. त्या भीतीमुळे बरीचशी मंडळी इकडून तिकडे उड्या मारत आहेत. गेले 70 ते 75 वर्षे कॉंग्रेस व राष्ट्रवादीसारख्या समिचारी पक्षांची सत्ता होती. मात्र याआधी असे कधीच झालेले नाही, अगदी दिल्लीपासून ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या निवडणुकीत भाजप सरकार कायद्याला गुंडाळून स्वतःच्या फायद्यासाठी वापरत आहेत.

पवारांवरील आरोपाचा जनता सूड घेईल
विरोधी पक्ष कधीच संपत नाही. विरोधी पक्षात नेहमी वाढ होत असते. व्यक्ती संपते, पक्ष संपत नाही. ज्या झाडाखाली मी वाढलो, मोठा झालो त्या झाडाला आज मी का सोडायचे. ते माझ्या आई-वडिलांप्रमाणे आहे. अशा आई- वडिलांना फक्त सत्ता नाही म्हणून सोडायचे का? असे असेल तर मग राजकारण्यांची संज्ञा अशा लोकांना लागू होत नाही.

पवार साहेबांवर ईडीच्या चौकशीत नाव येणे हे धडधडीत खोटे आहे. ज्या व्यक्तीने केव्हाही जिल्हा बॅंक अथवा शिखर बॅंकेचे सदस्यत्व आणि संचालक पद घेतलेले नाही, अशा व्यक्तीचे नाव चौकशीत कसे येते. ईडीला येडे करणारे आमचे पवार साहेब आहेत. त्यामुळे राज्यभरातून पवार साहेबांविषयी सहानुभूतीची लाट उसळली. यातून भाजप सरकार कोणत्या पद्धतीने कायद्यांचा वापर करून सरकारच्या यंत्रणांमधून लोकांना कसे अडचणीत आणतो हे उघड झाल्यामुळे या निवडणुकीत पक्षाला त्याचा फायदाच होईल.

अगदी शिवसेना व भाजप युतीमागेही ईडीचा धाक दाखवलेले असल्याचे नाकारता येत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी केव्हाही गुडघे टेकवले नाहीत. मात्र आत्ताची शिवसेना सपशेल गुडघ्यावर आली आहे. आता शिवसेनेत गेलेले आमचेच सहकारी व बांधव आहेत.  तरीसुद्धा नवी मुंबईत त्यांना एकही जागा देऊ शकले नाहीत. याचे आश्‍चर्य वाटत आहे.


कमी वेळेत ध्येय गाठणार
गेल्या 40 वर्षांत नवी मुंबईत घाटावरचा उमेदवार केव्हाच नव्हता. पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकणस्थ व विदर्भाला केव्हाच नेतृत्व दिलेले नाही. आता माझ्या रूपाने मिळालेली संधी ही नैसर्गिकरित्या मिळालेली संधी आहे. त्यामुळे या घाटावरच्या समाजाच्या नागरिकांमध्ये एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली आहे. अनेकांचे प्रतिसाद मला रोजच्या रोज येत आहेत; परंतु माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे.

विस्कटलेली घडी बसवताना मला खूप कमी वेळ मिळाला. या वेळेत पक्षाचे ध्येय व चांगल्या बाजू सर्वांपुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना संजीवनी म्हणून ठरलेली साडेबारा टक्के योजना आमच्या शरद पवार साहेबांनी आणली. भूमिहीन झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरी देण्याचे निर्णय शरद पवार यांचे. याशिवाय मोरबे धरण तयार करण्याची दृष्टीही पवार साहेबांचीच आहे.

जे पेरले ते पीक मिळाले
राष्ट्रवादीतून झालेल्या पक्षांतरामुळे मला आव्हाने नाही तर खरा अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे. यातून मला शिकायला व अनुभवायला मिळत आहे. गणेश नाईक दुसऱ्या पक्षात गेले, याचे मोठे दुःख आहे. त्यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. मात्र शरद पवार यांच्या कर्तृत्वामुळे कमी दिवसांत मला पक्ष उभा करता आला. त्यांनी एवढी वर्षे नवी मुंबईत जे पेरले होते ते पीक आज मला मिळाले.

राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांचा राग आजही अनेक पवार समर्थकांच्या मनात आहे. प्रचाराला फिरताना हा राग मला अनेकांच्या बोलण्यातून, भेटीतून जाणवतो. आई-वडिलांनी वाढवायचे आणि परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडून असे निघून जाणे, ही भावना प्रत्येक पवार समर्थकांमध्ये आहे. त्याचा वचपा नाईकांच्या आणि महायुतीच्या विरोधात मतदान करून मतदार काढतील.

बाजार समितीची गरज
भाजप सरकारने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मोडीत काढली आहे. मुळात या संस्थेची शेतकऱ्यांना अतिशय गरज आहे. ज्या ठिकाणी नियंत्रण आणण्याची गरज आहे, तिकडे नियंत्रण न आणता दुसरीकडे नियंत्रण ठेवले जाते. फूटपाथवर बसलेल्या व्यावसायिकांमुळे बाजार असमतोल होत आहे. भाजपला कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या जेवढ्या अर्थसाह्य करणाऱ्या संस्था आहेत त्या मोडीत काढायच्या आहेत.

 नवी मुंबईत समाजसेवा करणारे एकही रुग्णालय नाव घेण्यासारखे नाही. पालिकेने आलिशान इमारती रुग्णालयांच्या बांधल्या आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करून चांगल्या दर्जाचे आरोग्य व्यवस्था तयार करता आली नाही. आम्ही आरोग्यासाठी एक चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळण्यासाठी ऑनलाऊईन ऍप तयार केले आहे. या माध्यमातून आरोग्य सुविधा देणार आहोत.

कौशल्य विकास केंद्र उभारणार
शहरात अनेक भागात चांगल्या दर्जाचे कौशल्य अंगात असलेले तरुण-तरुणी राहतात. मात्र, ते गरीब असल्यामुळे अथवा मागास असल्याने त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. अशा होतकरू तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्र तयार केले जाणार आहे. 

नवी मुंबईत  लोकांसाठी माझ्याकडे वकिलांची असलेली टीम वापरून एक संस्था निर्माण करणार आहे. लोकांना चांगल्या पद्धतीचा मोफत सल्ला दिला जाणार आहे.

स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवंत मुलांना चांगले मार्गदर्शन मिळावे, याकरीता एका चांगल्या दर्जाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्याची संकल्पना आहे. विविध दर्जेदार कोचिंग क्‍लास व तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली हे केंद्र चालवण्यात येणार आहे.

शहरातील उभारलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी फक्त शोभेपुरती झाडे झाडे ना लावता भरपूर झाडे लावली आणि वाढविली जावीत म्हणून प्रयत्न करणार . प्लास्टिक बंदी सर्वसामान्यांना विश्वासात घेऊन राबवणार . शहरात क्रीडा संकुले तयार करण्याचा मानस आहे.

बेकायदा झोपड्यांचा विळखा आवरणार
दगडखाणींच्या मोकळ्या जागांवर दिवसेंदिवस बेकायदा झोपड्या वाढत आहेत. अशा वाढणाऱ्या झोपड्यांना आळा बसवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलायला हवी होती. बेकायदा झोपड्यांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी. तसेच पुन्हा झोपडी होऊच द्यायची नाही, असा एक निश्‍चय करू या.

सिडकोचे दुर्लक्ष
सिडकोने नवी मुंबईकडे दुर्लक्ष केले आहे. सिडकोची निर्मिती व्यापारी कारणाकरीता केलेली नसून गरजेसाठी केली आहे. भूखंड व घरे विक्री करून सिडकोने मोठा नफा कमावला आहे. अगदी खुराड्यासारखी घरे सिडकोने लोकांना दिली आहेत. अशा सिडकोमागे ईडी का लागत नाही?

बेलापूर मतदारसंघात विकासाचा अभाव आहे. सरकारचा निधी येत नसतो, तो आणावा लागतो. मात्र, आमच्या आमदारांना हा निधी आणण्यात अपयश आले. आपल्या मतदारसंघाचा चहुबाजूने विकास न केल्यामुळे माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष देणार आहे.



 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com