बैलगाडा शर्यती राष्ट्रवादीनेच बंद पाडल्या : आढळराव पाटील

बैलगाडा शर्यती राष्ट्रवादीनेच बंद पाडल्या : आढळराव पाटील

शिक्रापूर : `` देशात पहिल्यांदा बैलगाडा शर्यती कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात २००५ मध्ये बंद झाल्या. पुन्हा सन २०११ ला केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांच्या अध्यादेशाने बंद पडल्या, काही काळाने सन २०१३ मध्ये दिलीप वळसे पाटील नगरचे पालकमंत्री असताना तेथील प्राणी मित्र संघटनेच्या याचिकेवरुन शर्यती बंद झाल्या. हा सर्व बैलगाडा शर्यती बंद होण्याचा इतिहास तपासता महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या षडयंत्रानेच बंद झाल्याचा सणसणारी आरोप खासदार शिवाजीराव आढळराव यांनी आसखेड बुद्रुक (ता. खेड) येथील सभेत केला असून या षडयंत्राचा खुलाचा करण्याचेही आव्हान त्यांनी दिले आहे.

शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ आज खेड तालुक्यातील भाम येथून प्रचाराला प्रारंभ केला. पुढे पिंपरी-बुद्रुक, लादवड, किवळे, कोरेगाव-बुद्रुक, आसखेड-बुद्रुक असा दौरा दुपारपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात संपन्न झाला.

यावेळी बोलताना त्यांनी पुढे सांगितले की, सन २००४ मध्ये राष्ट्रवादीच्य विरोधात बैलगाडा शौकीन उतरल्याने पहिल्यांदा राष्ट्रवादीने बैलगाडा शर्यती २००५ मध्ये बंद केल्या. मी लगेच न्यायालयात गेल्यावर सन २००६ पासून त्या पुन्हा सुरू झाल्या. मात्र सन २०११ मध्ये तत्कालीन कॉंग्रेसच्या पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी सिंह, वाघ अस्वलांबरोबरच आपल्या शेतातील बैलही टाकला आणि बैलगाडा शर्यती कायद्यात अडकल्या. याबाबत मी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि नटराजन बाईंच्या अध्यादेशाला स्थगिती मिळविली. मात्र इथेही कॉंग्रेस-राष्ट्रवादी थांबली नाही.

त्यांनी मग दिलीप वळसे पाटील हे ज्या नगर जिल्ह्यात पालकमंत्री होते त्या तालुक्यातील प्राणी मित्र संघटना जागी केली आणि ही संघटना न्यायालयात गेल्याने बैलगाडा शर्यती कायद्यात अडकवल्या. मात्र हे होताना आपण बैलगाडा शर्यतींची आडकाठी कायमची दूर करण्यासाठी आपण थेट कायद्यात बदल करण्यासाठी संसदेत खाजगी विधेयम मांडून दाद मागितली तर दूसरीकडे बैलगाडा शर्यतीच्या अंतीम निकालासाठी आता पाच न्यायाधिशांचे पूर्ण बेंचपुढे सुनावनी होत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या एवढ्या षडयंत्रानंतरही आपण ही लढाई आता विजयापर्यंत आणल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान बैलगाडा शर्यतींच्या राष्ट्रवादीच्या कुटील लढाईचा इतिहास सांगण्याचे आव्हानही यावेळी आढळराव यांनी दिले.

कार्यक्रमाला आमदार सुरेश गोरे, जिल्हाध्यक्ष राम गावडे, जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, सरपंच ताईबाई सप्रे, महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, गणेश सांडभोर, महादेव लिंभोरे, सारिका घुमटकर, उमा सांडभोर, शंकर राक्षे, संदीप गाडे, बाबाजी सोंडेकर सागर तांबे, कालिदास तांबे, व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सुदाम कराळे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com