धर्मनिरपेक्षतेची जबाबदारी आमची  एकट्याची नाही, राष्ट्रवादीचा कॉंग्रेसला टोला 

धर्मनिरपेक्षतेची जबाबदारी आमची  एकट्याची नाही, राष्ट्रवादीचा कॉंग्रेसला टोला 

नवी दिल्ली ः धर्मनिरपेक्षतेचा उपदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसला केला जाऊ नये. आमच्याकडे बोट दाखविल्यास चार बोटे तुमच्याकडेही असतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल उलटसुलट चर्चा केली जाते. परंतु पक्षाने नेहमी धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांशी आघाडीची तयारी दर्शविली आहे. पण ही जबाबदारी एकट्या "राष्ट्रवादी'ची नाही असे खडे बोल राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज कॉंग्रेसला सुनावले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानीत झालेल्या सोहळ्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी "पक्षाच्या राजकीय संदेशा'तून कॉंग्रेसला दोन गोष्टी सांगितल्या आहेत. पक्षाच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित करणाऱ्यांचा समाचार पटेल यांनी घेतला आहे . 

राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉंग्रेसला "ही एकजूट टिकविण्याची जबाबदारीही घ्या', असा सल्लावजा इशाराही पक्षाने दिला आहे. गोव्यात आघाडी न केल्यामुळेच कॉंग्रेसला सत्ता मिळाली नाही. गुजरातमध्येही भाजपशी स्वबळावर लढण्यासाठी कॉंग्रेस सक्षम नाही, असे चिमटे काढतानाच "आघाडीच्या राजकारणा'चा सूचक संदेशही कॉंग्रेसला दिला. 

गोवा, उत्तर प्रदेशात कॉंग्रेसशी आघाडीची तयारी होती, असे सांगताना पटेल म्हणाले, ""गोव्यामध्ये आघाडीबाबत बोलणी होऊनही अखेरपर्यंत कॉंग्रेसचे "कभी हां, कभी नां' सुरू राहिले आणि आघाडी झाली नाही. म्हणूनच सर्वाधिक जागा जिंकूनही कॉंग्रेसला गोव्यात सत्ता मिळाली नाही. उत्तर प्रदेशातही कॉंग्रेसने प्रतिसाद दिला नाही. आता गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि मेघालयमधील विधानसभा निवडणुकांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. यातील मेघालयमधील सर्व 60 जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर लढणार आहे.'' 

गुजरातमध्ये अद्‌भुत परिस्थिती असून तेथे कॉंग्रेस स्वबळावर भाजपला मुकाबला करण्यासाठी सक्षम नसल्याचा त्यांनी टोला लगावला. गुजरातमध्ये "राष्ट्रवादी'चे दोन आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ नऊ जागा दिल्या आणि करारही मोडला याकडे लक्ष वेधताना पटेल यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने होऊ पाहणारे ऐक्‍य टिकविण्याची जबाबदारी एकट्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची नव्हे तर तुमचीही आहे हे लक्षात ठेवा, असा स्पष्ट इशारा कॉंग्रेसला दिला. 
--- 
शरद पवारांवर स्तुतीसुमने 
शरद पवार यांच्या स्तुतीसुमने उधळताना पटेल म्हणाले, की राष्ट्रवादी कॉंग्रेसला देशभरात महत्त्व आमदार, खासदारांच्या संख्येमुळे नव्हे तर शरद पवारांमुळे असून कोणीही सत्ताधीश असला तरी युक्तीच्या चार गोष्टी समजून घेण्यासाठी तो फक्त पवारांकडेच येतो ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची खरी ताकद आहे. कृषी कर्जावरील 12 टक्के व्याजदर चार टक्‍क्‍यांवर पवारांनीच आणला आणि "एमएसपी'ही त्यांच्याच कृषी मंत्रिपदाच्या काळात झपाट्याने वाढल्या. उत्तर प्रदेशात भाजपने जिंकण्यासाठी कर्जमाफीचे आश्‍वासन दिले. पण संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना शरद पवार यांनी कर्जमाफी दिली होती, असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com