राष्ट्रवादी व नारायण राणे यांच्या मैत्रीवर पडदा! आणाभाका व्हायच्या आधीच ताटातूट!

राष्ट्रवादी व नारायण राणे यांच्या मैत्रीवर पडदा! आणाभाका व्हायच्या आधीच ताटातूट!

चिपळूण : लोकसभेसाठी नारायण राणेंच्या पक्षाला पाठिंबा देण्यास राष्ट्रवादीने नकार दिला आहे. त्यामुळे राणे आणि राष्ट्रवादीतील राजकीय मैत्रीवर पडदा पडला आहे. शिवसेना-भाजपची युती झाल्यास राणेंच्या स्वाभिमान पक्षाला स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय राहणार नाही. ही त्यांच्या विधानसभेसाठीची रंगीत तालमी असणार आहे. 

कॉंग्रेसमध्ये घुसमट झाल्याने नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत वेगळी चूल मांडली. याच वेळी भाजपला पाठिंबा दिला. भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत.

कोकणात शिवसेनेबरोबर स्वाभिमान पक्षाने लोकसभेची तयारी करत मेळावे, पक्षप्रवेश सुरू केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात माजी खासदार नीलेश राणे सक्रीय झाले आहेत. शिवसेना-भाजप यांची लोकसभेसाठी युती होण्याची शक्‍यता आहे. युती न झाल्यास राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपबरोबर राहू शकतो. राणेंचे प्रभावक्षेत्र असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपशी वाटाघाटी होऊ शकतात.

या मतदारसंघात भाजपचे संभाव्य उमेदवार केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू आहेत. वाटाघाटीत ही जागा स्वाभिमानला न मिळाल्यास प्रभूंना पाठिंबा देण्यात राणेंना फारशा राजकीय अडचणी येणार नाहीत. या बदल्यात आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानला कोकणातील जास्तीत जास्त जागा देण्याचा तोडगा निघू शकतो; मात्र युती झाल्यास या मतदारसंघावरील दावा शिवसेना सोडणार नाही. कारण त्यांचा प्रभाव असलेले पाच विधानसभा मतदारसंघ याच लोकसभा मतदारसंघात आहेत. ही जागा शिवसेनेला सुटल्यास स्वाभिमानला दुसरा पर्याय निवडावा लागणार असल्यामुळे राणेंनी राष्ट्रवादीशी जवळीक वाढवली होती. 

राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसला पाठिंबा.... 

शरद पवार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राणेंनी त्यांची भेट घेतल्यामुळे ही मैत्री राणेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळेल, अशी चर्चा होती. मात्र परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने चिपळुणात आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोकणात कॉंग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केल्यामुळे राणे-राष्ट्रवादीच्या राजकीय मैत्रीवर पडदा पडला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com