शेवगांवच्या नगराध्यक्षा विद्या लांडे यांना हटविण्यासाठी राष्ट्रवादी-भाजप एकत्र 

शेवगांव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा विद्या लांडे यांच्या विरोधात काल सत्ताधारी राष्ट्रवादी, विरोधी भाजप व अपक्ष नगरसेवकांनी जिल्हाधिका-यांकडे अविश्वास ठराव दाखल केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्याच तालुक्‍यात हा प्रकार झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
शेवगांवच्या नगराध्यक्षा विद्या लांडे यांना हटविण्यासाठी राष्ट्रवादी-भाजप एकत्र 

शेवगांव (जि. नगर) : शेवगांव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा विद्या लांडे यांच्या विरोधात काल सत्ताधारी राष्ट्रवादी, विरोधी भाजप व अपक्ष नगरसेवकांनी जिल्हाधिका-यांकडे अविश्वास ठराव दाखल केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्याच तालुक्‍यात हा प्रकार झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 

नगरपरिषदेची निवडणुक जानेवारी 2016 रोजी झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस 9, भाजप 8 व अपक्ष 4 असे संख्याबळ झाले होते. राष्ट्रवादीने तीन अपक्षांना बरोबर घेवून गटनोंदणी केली होती. त्यानंतर नगराध्यक्षा विद्या लांडे यांची नगराध्यक्षा म्हणून निवड केली होती. मात्र दोन वर्षात नगराध्यक्षा व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये सतत खटके उडत होते. विरोधी नगरसेवकांच्या सांगण्यावरुन त्या कारभार पाहतात, अशा तक्रारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्याकडे केल्या होत्या. मात्र घुले यांनी या तक्रारीकडे म्हणावे तसे लक्ष न दिल्याने या नगरसेवकांच्या मनातली खदखद वाढत गेली. 

दोन महिन्यांपुर्वी याच नगरसेवकांनी नगराध्यक्षा लांडे यांना गटनेते पदावरुन हटवत अपक्ष नगरसेवक सागर फडके यांची गटनेता पदी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे रितसर जावून नियुक्ती केली. त्याचवेळी जिल्हाध्यक्ष घुले यांनी नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांना एकत्र करुन हा वाद मिटवायला पाहीजे होता. मात्र तो न मिटल्याने नगराध्यक्षा व नगरसेवकांमधील दरी वाढत गेल्याने त्याचा फायदा भाजपने योग्य वेळी उचल्याचे बोलले जाते. 

भाजपच्या काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या नाराज नगरसेवकांची आमदार मोनिका राजळे यांच्याशी भेट घडवून आणली. त्यामध्ये या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारीही दर्शविल्याचे बोलले जाते. या बैठकीनंतर काल गुरुवारी राष्ट्रवादीचे 6, भाजपचे 8 व अपक्ष एक अशा नगरसेवकांनी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला. दोन तीन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी नगरसेवक पळवा पळवीचे प्रकारही केले होते. मात्र अविश्वास ठराव दाखल झाल्याने त्यावर पडदा पडला आहे. 

नगराध्यक्षा लांडे यांची मुदत अवघ्या दीड महिन्यावर संपत आली असतांना या नगरसेवकांनी हे पाऊल उचल्यामुळे नागरीकांमध्ये मात्र वेगळाच संदेश गेला आहे. नगराध्यक्षा लांडे यांचे पती राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण लांडे यांनी पडत्या काळात राष्ट्रवादीला तारलेले आहे. त्यांचे या शहरावरती एकहाती वर्चस्व राहीलेले आहे. ते नेमकी कोणती भुमिका घेतात, याची उत्सुकता लागलेली आहे. 

पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष पद अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी राष्ट्रवादीच्या रत्नमाला तिजोरे व भाजच्या राणी मोहीते यांच्या पैकी एकीला लॉंटरी लागणार आहे. मात्र तिजोरे या अरुण लांडे यांच्या गटाच्या तर मोहीते या जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या गटाच्या आहेत. तिजोरे की मोहिते यापैकी कोण नगराध्यक्ष होणार याची मात्र आतापासूनच नागरीकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. 
राजकीय अपडेटसाठी सरकारनामा ऍप डाऊनलोड करा 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com