ncp | Sarkarnama

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या बैठकीस युवकांची दांडी,प्रदेशाध्यक्ष नाराज

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मे 2017

जळगाव : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा युवक कॉंग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. युवक कार्यकर्त्यानी दांडी मारल्यामुळे उपस्थिती कमी होती. त्यामुळे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर याच सभेत जिल्हाध्यक्ष योगेश देसले यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहिर केला, 

जळगाव : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा युवक कॉंग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. युवक कार्यकर्त्यानी दांडी मारल्यामुळे उपस्थिती कमी होती. त्यामुळे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर याच सभेत जिल्हाध्यक्ष योगेश देसले यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहिर केला, 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील हे प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत जळगाव येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात आयोजित या मेळाव्यास युवकांच्या मोठ्या उपस्थितीची अपेक्षा होती. मात्र मेळाव्यास अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. 

जिल्ह्यातील युवकांची संख्या कमी होती, शिवाय जिल्ह्यातील माजी आमदार, खासदार तसेच इतर पदाधिकारीही मेळाव्याला आले नाहीत. अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक, महानगराध्यक्ष परेश कोल्हे उपस्थित होते. युवकांच्या कमी उपस्थितीबाबत कोते पाटील यांनी सभेतच नाराजी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी युवकांनी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे असे आवाहनही केले. त्यांची नाराजी लक्षात घेवून जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष योगेश देसले यांनी याच सभेत आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची घोषणा केली, यावेळी ते म्हणाले, कि आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत आपण युवक कॉंग्रेसचे अनेक कार्यक्रम घेतले आहेत. आंदोलने केली आहेत. परंतु आपल्यावर नाराजी असेल तर आपण राजीनामा देत आहोत. मात्र नवीन युवक जिल्हाध्यक्ष नियुक्त करतांना तो आपल्यापेक्षा चांगले काम करणारा निवडावा, मात्र तो नेत्यांचा पुत्र नसावा, सर्व सामान्य कार्यकर्त्यातून त्याची निवड व्हावी असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यानंतर प्रदेशाध्यक्ष संग्राम पाटील यांनी जिल्हाध्यक्षांची निवड सर्व वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना विचारात घेवून लवकरच करण्यात येईल असे जाहिर केले. कमी उपस्थितीमुळे अवघ्या वीस मिनीटात सभा आटोपून ते पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. 
नव्यांना संधी मिळण्यासाठीच राजीनामा 
जिल्हा युवक कॉंग्रेस सक्षम करण्यासाठी आपण दोन वर्षे काम केले आहे. त्यात वेगवेगळे उपक्रम राबविले शिवाय आंदोलनेही केली आहेत. कमी उपस्थितीवरून नाराजी व्यक्त होत असेल तर नव्यांना संधी मिळावी याच उद्देशाने आपण जिल्हा युवक अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे असे सांगून संघटनेत यापुढेही आपण सक्षमतेने काम करणार असल्याचे देसले यांनी सांगितले 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख