दीडशेव्या जयंतीनिमित्त जागतिक पुस्तक प्रदर्शनात दिल्लीत मध्यवर्ती संकल्पना गांधीच

यंदाच्या प्रदर्शनातील मराठी दालन हेही वैशिष्ट्यपूर्ण राहणार आहे. गांधीजींवरील उत्तमोत्तम पुस्तकांनी हे दालन सजलेले असेल असे एनबीटीच्या सहाय्क संपादक निवेदिता मदाने यांनी सांगितले. मराठीमध्ये गांधीजींवर किमान 56 पुस्तके आतापावेतो प्रकाशित झालेली आहेत.
दीडशेव्या जयंतीनिमित्त जागतिक पुस्तक प्रदर्शनात दिल्लीत मध्यवर्ती संकल्पना गांधीच

नवी दिल्ली : राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (एनबीटी) येत्या 4 ते 12 जानेवारीदरम्यान प्रगती मैदानावर होणाऱ्या जागतिक पुस्तक प्रदर्शनात यंदा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या लेखणीच्या विविध पैलूंचे दर्शन घडणार आहे. "गांधी ः लेखकांचे लेखक' ही यंदाच्या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. मराठीत प्रकाशित झालेली गांधीजींवरील अनेक प्रसिध्द पुस्तकांचे दालन व गांधीजींच्या साहित्यावरील परिसंवाद हेही दिल्लीच्या मराठी ग्रंथरसिकांसाठी आकर्षण असेल. "आपले जीवन खुले पुस्तक असावे' या गांधीजींच्या प्रसिध्द उद्गारांभोवती मध्यवर्ती कार्यक्रम असतील. 

महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त यंदाच्या जागतिक पुस्तक प्रदर्शनात लेखक, प्रकाशक व संपादक म्हणून गांधीजींच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात येईल असे एनबीटीचे अध्यक्ष गोविंदप्रसाद शर्मा व संचालिका नीरा जैन यांनी आज सांगितले. मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते चार जानेवारीला सकाळी नऊला प्रदर्शनाचे उद्घघाटन होईल. सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत गांधीजींच्या लेखनकार्यावर चर्चा, परिसंवाद, नुक्कड नाटक, समूहनृत्य, गीतसंगीताच्या कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी साहित्य रसिकांना मिळेल. 

प्रगती मैदानाच्या नव्या इमारतींचे काम पूर्ण झालेले नसल्याने यंदा "अतिथी देश' ही संकल्पना ठेवलेली नाही व दालनांचा आकारही आकुंचन पावलेलाच राहणार असला तरी पुढच्या वर्षीपासून भव्य दालनात हे प्रदर्शन भरेल असा विश्‍वास जैन यांनी व्यक्त केला. केवळ याच नव्हे तर अबूधाबी, फ्रॅंकफर्ट येथे झालेल्या व फ्रान्समध्ये लवकरच होणाऱ्या जागतिक पुस्तक प्रदर्शनांतही भारताने गांधीजी हाच केंद्रबिंदू ठेवल्याचे शर्मा म्हणाले.यंदा शेकडो भारतीय प्रकाशकांसह 23 नामवंत विदेशी प्रकाशकही यात सहभागी होणार आहेत. मोबाईलमध्ये रमणाऱ्या नव्या पिढीत वाचन संस्कृतीच्या विकासासाठी वातावरणनिर्मिती करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले. एनबीटीने 90 कोटी रूपयांची ग्रंथविक्री केली आहे असे शर्मा म्हणाले. 

यंदाच्या प्रदर्शनातील मराठी दालन हेही वैशिष्ट्यपूर्ण राहणार आहे. गांधीजींवरील उत्तमोत्तम पुस्तकांनी हे दालन सजलेले असेल असे एनबीटीच्या सहाय्क संपादक निवेदिता मदाने यांनी सांगितले. मराठीमध्ये गांधीजींवर किमान 56 पुस्तके आतापावेतो प्रकाशित झालेली आहेत. पत्रकार महर्षी गोविंद तळवलकर, साने गुरूजी, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी आदींच्या पुस्तकांचा समावेश आहे. यातील अनेक पुस्तके यंदाच्या प्रदर्शनात रसिकांना पाहता येतील. याशिवाय 5 जानेवारी रोजी दुपारी अडीचपासून परिसंवाद होणार आहे. त्यात बी एस मिरगे, अविनाश दुधे व मदन दुबे सहभागी होतील. 

गोडसेवर पुस्तक नाही ! 
या प्रदर्शनात भारताच्या शेजारी देशांचा सहभाग नसल्याचे शर्मा यांनी सांगितले. सध्याच्या राजकीय समीकरणामुळे शेजारी देश येत नाहीत असेही त्यांनी मान्य केले. विशेषतः 2014 पासून ही संख्या कमी कमी होत गेली आहे. बांगला देशच का, सारेच शेजारी आपले मित्र आहेत, शत्रू कोण आहे, असाही प्रतिप्रश्‍न त्यांनी विचारला. राष्ट्रपित्याचा मारेकरी नथूराम गोडसे याच्यावर एनबीटीचे कोणतेही पुस्तक नाही व तसे प्रकाशित करण्याचा विचारही नाही असे शर्मा यांनी सांगताच सभागृहात हास्याची लकेर उमटली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com