धार्मिक-सांस्कृतिक विविधता संपवण्याचा प्रयत्न : नयनतारा सहगल 

धार्मिक-सांस्कृतिक विविधता संपवण्याचा प्रयत्न : नयनतारा सहगल 

नागपूर : सध्या देशामध्ये जे काही चालले आहे, त्या आपल्या जीवनाच्या प्रत्येक बाबीवर परिणाम करीत असून आपण काय खातो, कुणाशी विवाह करतो, काय विचार करतो, काय लिहितो यावरून भयंकर हल्ले होत आहे. एकाच धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पाहणाऱ्या धोरणामुळे देशातील धार्मिक व सांस्कृतिक विविधता धोक्‍यात आल्याचा इशारा ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी दिला आहे. 

यवतमाळ येथे 11 जानेवारीला अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार होते. परंतु काहींनी विरोध केल्याने तसेच संमेलनच उधळून लावण्याची धमकी दिल्याने आयोजकांनी सहगल यांचे उद्‌घाटक म्हणून दिलेले निमंत्रण रद्द केले आहे. सहगल यांनी मात्र हे भाषण आयोजकांना आधीच पाठविले होते. या भाषणातून त्यांनी आजच्या धार्मिक, सांस्कृतिक व साहित्यक स्थितीवर तीक्ष्ण शब्दात हल्ले चढविले आहेत. 

भाषणाच्या सुरूवातीला त्यांनी महाराष्ट्राशी असलेल्या नात्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. नयनतारा सहगल या रणजित व विजयालक्ष्मी पंडीत या दाम्पत्याच्या कन्या आहेत. रणजित पंडीत यांचे पूर्वज मूळचे कोकणातील आहेत. या नात्याने त्या जन्माने मराठी आहेत. त्यांचे चुलत आजोबा शंकर पांडुरंग पंडीत हे मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवणारे व समाजसुधारक महादेव गोविंद रानडे यांचे स्नेही होते, असा भावनिक उल्लेखही त्यांनी भाषणात केला आहे. त्यामुळेच माझ्यासाठी हा भावनिक क्षण असल्याचे त्यांनी भाषणात म्हटले आहे. 

जवळपास 10 पानांच्या भाषणात त्यांनी सध्याच्या स्थितीवर परखड मत नोंदविले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची जडणघडण करणाऱ्या पूर्वसुरींनी धार्मिक ओळख नाकारली होती व भारताला एक निधर्मी लोकशाही प्रजासत्ताक देश घोषित करण्याचा सूज्ञपणा दाखवला होता. हा उच्च आदर्श घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून झाला होता. ते योगायोगाने मराठी होते. परंतु या मूल्यांना पायदळी तुडविणाऱ्यांचा आता हैदोस वाढला आहे. 

सरकारही मूकपणे या हिंसाचाराकडे पाहत आहे. गोहत्येच्या नावावरील हल्ले सुरू असताना सरकारी यंत्रणा मूकदर्शक झाल्या तर न्यायाकरीता कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? असा सवाल त्यांनी केला आहे. सहगल यांनी नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्यांचाही उल्लेख केला आहे. साहित्य व कलेवर नियंत्रण हा हुकूमशाहीचे लक्षण असल्याचे त्यांनी या भाषणात म्हटले आहे. या भाषणात त्यांनी मॉब लिंचिंग, इतिहासाचे पुनर्लेखन, सरकारी संस्थांची स्वायत्तता, साहित्यिकांची भूमिका यावर परखड मते व्यक्त केली आहेत.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com