Nayana Pujari Murder Case | Sarkarnama

नयना पुजारी बलात्कार-खून प्रकरणी तीन दोषी

महेंद्र बडदे
सोमवार, 8 मे 2017

अशाप्रकारच्या खटल्यांची सुनावणी लवकर होण्याची आवश्यक आहे - अभिजीत पुजारी (नयना पुजारी यांचे पती)

पुणे - संगणक अभियंता नयना पुजारी यांच्यावर बलात्कार करुन खून करणार्या तीन जणांना विशेष न्यायाधीश एल.एल येनकर यांनी दोषी ठरवले. सुमारे सात वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला. या तिघांनाही उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

योगेश अशोक राऊत (वय 24 रा. गोळेगाव, खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय 24, रा. सोळू, खेड), विश्‍वास हिंदूराव कदम (वय 26, रा. दिघी, मूळ रा. सातारा) अशी शिक्षा सुनावण्यात आणलेल्या आरोपींची नावे आहे. या गुन्ह्यातील आरोपी राजेश पांडुरंग चौधरी हा माफीचा साक्षीदार झाला ही या खटल्याच्या सुनावणीमधील महत्वाची घटना ठरली. आरोपींविरुद्ध अपहरण, बलात्कार, खून करणे, चोरी करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमांनुसार आरोप ठेवण्यात आले होते.

चौधरी याचा फौजदारी दंड संहिता कलम 164 नुसार न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदविलेला जबाब, विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी 37 जणांची नोंदविलेली साक्ष, आरोपींविरुद्ध पोलिसांनी सादर केलेला भक्कम परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावा, आरोपी आणि पीडित पुजारी यांना एकत्रित पाहणाऱ्यांची साक्ष अशा मुद्यांच्या आधारे आरोपींनीच हा गुन्हा केल्याचे सिध्द झाले.

ऑक्‍टोबर 2009मध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. पुजारी यांचा मृतदेह राजगुरुनगरजवळील जरेवाडी येथे सापडला होता. त्यांच्या चेहऱ्यावर दगड मारून विद्रूप केला गेला होता. तत्पूर्वी त्यांच्यावर बलात्कार करून गळा आवळून खून केला होता. या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी घटनेनंतर एका आठवड्याच्या आत अटक केली होती. यापैकी योगेश राऊत हा फरारी झाला होता. त्याला पोलिसांनी नंतर पुन्हा अटक केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख