Navneet Rana's Election Challenged | Sarkarnama

नवनीत राणा यांच्या विजयाला आव्हान; नागपूर खंडपीठात दोन याचिका दाखल 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 जुलै 2019

अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनीत कौर राणा यांच्या निवडणुकीतील विजयाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात इलेक्‍शन पीटिशनद्वारे माजी खासदार आनंदराव अडसूळ व सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररीत्या दाखल केल्या आहेत.

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनीत कौर राणा यांच्या निवडणुकीतील विजयाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात इलेक्‍शन पीटिशनद्वारे माजी खासदार आनंदराव अडसूळ व सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररीत्या दाखल केल्या आहेत.

'अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या मागासवर्गीय व्यक्तीकरिता राखीव असताना 'लभाना" जातीच्या नवनीत रवी राणा यांनी निवडणूक लढून मागासवर्गीयांचा संवैधानिक अधिकार हिरावून घेतला. नवनीत राणा यांच्या वडिलांचे मोची जातीचे जातप्रमाणपत्र मुंबई जातपडताळणी समितीच्या निर्णयामुळे रद्द करून जप्त करण्यात आले आहे. असे असताना मूळ पंजाब येथील लभाना जातीच्या व्यक्तीकडून अमरावतीत मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या राखीव जागेवर निवडणूक लढून खऱ्या पात्र मागासवर्गीय व्यक्तीवर त्यांनी अन्याय केला आहे,' असे आनंदराव अडसूळ यांचे म्हणणे आहे. 

सर्व सरकारी पुराव्यांसह आणि लोकसभा निवडणुकीत केलेल्या प्रक्रियेविरुद्ध या दोन्ही याचिकेत आरोप करण्यात आले आहेत. नवनित राणा यांनी नोकरीच्या कारणासाठी काढलेले मोची जातीचे प्रमाणपत्र लोकसभा निवडणूक अर्जासोबत जोडून निवडणूक लढविली. पंजाब सरकारच्या महसूल सचिवांनी केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या समोर सादर केलेल्या नवनीत राणा यांच्या लभाना जातीच्या कागदपत्रांसह याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी नागपूर येथे उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र इलेक्‍शन पीटिशन सादर केल्या आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून आनंदराव अडसूळ यांच्या वतीने अॅड. सचिन थोरात व स्थानिक मतदार या नात्याने सुनील भालेराव यांच्या वतीने अॅड. राघव कवीमंडन यांनी दोन्ही याचिका सादर केल्या आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख