नवनीत राणांनी लोकसभेत केले आडसुळांवर घोटाळ्याचे आरोप 

अर्थमंत्र्यांना माझी विनंती आहे की, या बॅंकेचे अध्यक्ष आनंदराव आडसूळ आणि त्यांचे पी. ए. सुनील भालेराव यांच्यावर त्वरित चौकशी करून कारवाई करावी. -नवनीत राणा
Navneet-kaur-rana
Navneet-kaur-rana

नवी दिल्ली :  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी  लोकसभेत आपले कट्टर राजकीय विरोधक आनंदराव आडसूळ यांना टार्गेट केले.

संसदेत बोगस कंपन्यांची नोंदणी करून चिटफंडच्या नावाखाली सर्वसामान्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी एक विधेयक गुरुवारी मांडण्यात आले. या विधेयकावर चर्चा सुरू असताना खासदार नवनीत कौर राणा यांनी आनंदराव आडसूळ यांच्यावर तोफ डागली.

त्या म्हणाल्या, "मुंबईमध्ये सिटी को- ऑपरेटिव्ह बॅंक आहे. या बॅंकेच्या दहा शाखा आहेत. 91 हजार खातेधारक आहेत. बॅंकेचे प्रमुख आनंदराव आडसूळ यांच्या कारभारामुळे बॅंकेचे दिवाळे निघाले आहे. गोरगरिबांच्या ठेवी या बॅंकेत आहेत. बड्या बिल्डरांची 50 लाखांची मालमत्ता गहाण ठेवून त्यावर 10 ते 20 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे प्रकार या बॅंकेत घडले. बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांनी 20 ते 30 टक्के कमिशन प्रत्येक कर्जवाटपात घेऊन ही बॅंक बुडवली आहे. कोणाचे मुलीच्या लग्नासाठी तर कोणाचे मुलाच्या शिक्षणासाठी पैसे या बॅंकेत होते. बॅंक बुडाल्याने ठेवीदारांचे सुमारे 900 कोटी रुपये यात अडकले आहेत.''

नवनीत राणा पुढे म्हणाल्या, "या धक्‍क्‍याने चार-पाच खातेधारकांनी आत्महत्या केली आहे. छोटे दुकानदार, कामगार अशा गरिबांचे पैसे या बॅंकेत होते. रिझर्व बॅंकेच्या आणि सहकार आयुक्तांच्या चौकशीत या सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ दोषी आढळलेले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात दोनदा चौकशीचे आदेश दिले. राष्ट्रपती कार्यालयातूनही सचिवांनी चौकशीचे पत्र दिले आहे. अर्थमंत्र्यांना माझी विनंती आहे की, या बॅंकेचे अध्यक्ष आनंदराव आडसूळ आणि त्यांचे पी. ए. सुनील भालेराव यांच्यावर त्वरित चौकशी करून कारवाई करावी.''

नवनीत कौर राणा या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी अमरावती मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव आडसूळ या मातब्बर नेत्याचा नुकताच पराभव केलेला आहे. मात्र या दोन नेत्यांमध्ये संघर्ष एव्हढ्या टोकाला गेलेला आहे की परस्परांची कोंडी करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com